दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली हा आयसीसी टी-२० मानांकनात अव्वल स्थानावर कायम आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या मानांकनात सुधारणा केली आहे. कोहलीने टी-२० मालिकेत १०४ धावा केल्या होत्या. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला १३ गुणांचा फायदा झाला. दुसºया स्थानावर आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच हा असून तो कोहलीच्या ४० गुणांनी पिछाडीवर आहे.
रोहितने तीन सामन्यांत ९३ तर धवनने ८७ धावा केल्या होत्या. रोहितने तीन स्थानांनी सुधारणा केली असून तो २१ व्या तर धवनने २० स्थानांनी प्रगती करून ४५व्या स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजीत, जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन स्थानांनी प्रगती करीत २६व्या स्थानी तर फिरकीपटू युजवेंद्र चहल ३० व्या स्थानी पोहोचला आहे. अक्षर पटेलने १७ स्थानांनी सुधारणा करीत ६२ वे स्थान प्राप्त केले.

टीम रँकिंगमध्ये भारत पाचवा
न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्याने भारताला ३ गुणांचा फायदा झाला आहे. मात्र, दशांश गुणांच्या आधारावर इंग्लंडनंतर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने आपले अव्वल स्थान पाकिस्तानला सोपवले. न्यूझीलंड आता १२५ गुणांवरून १२० गुणांवर पोहोचला. पाकिस्तानचे १२४ गुण आहेत. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोढी याने पाच स्थानांनी प्रगती करीत करिअरमधील पहिल्यांदाच अव्वल १० मध्ये स्थान मिळवले आहे. ट्रेंट बोल्टने सर्वश्रेष्ठ १६ वे स्थान मिळवले आहे.