मोहाली : लोकेश राहुलने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळीच्याजोरावर आर. आश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ गडी आणि ७ चेंडू राखून मात करीत आपणच किंग असल्याचे सिद्ध केले.
लोकेश राहुलच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले. पंजाबकडून लोकेश राहुलने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत १६ चेंडूंतच ६ षटकार आणि ४ चौकारांसह ५१ धावांचा पाऊस पाडला. करुण नायरने ३३ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ५0 धावा केल्या. डेव्हिड मिलरने २४ व मार्कस स्टोईनिसने नाबाद २२ धावा केल्या. विजयाचा पाठलाग करताना लोकेश राहुलने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकत मयांक अग्रवालसह २0 चेंडूंतच ५८ धावांची सलामी दिली. आपल्या आक्रमक अर्धशतकी खेळीत राहुलने विशेषत: फिरकी गोलंदाज अमित मिश्राचा समाचार घेत त्याच्या पहिल्याच षटकात २४ धावा चोपत २ षटकार व ३ चौकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर मिलर व स्टोईनिस यांनी ४१ धावांची भागीदारी करीत पंजाबचा विजय साकारला.
त्याआधी कर्णधार गौतम गंभीरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने ७ बाद १६६ धावा केल्या. पंजाबने अफगाणिस्तानच्या १७ वर्षीय आॅफस्पिनर मुजीब उर रहमान याचा संघात समावेश केला, जो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे. कर्णधार गौतम गंभीरने धावबाद होण्याआधी ४२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५५ धावा केल्या. ऋषभ पंत यानेही २८ धावांचे योगदान दिले, तर ख्रिस मॉरीस २७ धावांवर नाबाद राहिला. पंतने १३ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार ठोकला. रहमानने २८ धावांत २ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
>राहुलचे विक्रमी अर्धशतक : लोकेश राहुलने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. त्याने दिल्लीविरुद्ध १४ चेंडूंत ठोकले. यासह त्याने याआधीचा युसूफ पठाण व सुनील नारायण यांचा विक्रम मोडला. या दोघांनी प्रत्येकी १५ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. लोकेश राहुलने त्याच्या या वादळी खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
>संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स
२0 षटकांत ७ बाद १६६.
(गौतम गंभीर ५५, ऋषभ पंत २८, ख्रिस मॉरीस नाबाद २७. मोहित शर्मा २/३३, मुजीब उर रहमान २/२८, आर. आश्विन १/२३, अक्षर पटेल १/३५).
किंग्ज इलेव्हन पंजाब
१८.५ षटकांत ४ बाद १६७.
लोकेश राहुल ५१, करुण नायर ५0, डेव्हिड मिलर नाबाद २४, स्टोईनिस नाबाद २२. डॅनियल ख्रिस्टियन १/१२, आर. टष्ट्वेटिया १/२४, ख्रिस मॉरीस १/२५, ट्रेंट बोल्ट १/३४).