भारताच्या क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी

आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र भारत जिंकू शकला नाही याचे दु:ख आहे. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असतानाही आपल्याकडे विजयाची संधी होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:36 AM2018-11-22T01:36:55+5:302018-11-22T01:37:14+5:30

whatsapp join usJoin us
India's fielders have a poor performance | भारताच्या क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी

भारताच्या क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)

आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र भारत जिंकू शकला नाही याचे दु:ख आहे. अखेरच्या षटकात
१३ धावांची गरज असतानाही आपल्याकडे विजयाची संधी होती. मात्र दिनेश कार्तिक व रिषभ पंत दोघेही बाद झाल्याने भारताच्या
आशा मावळल्या. त्याचबरोबर भारतीय संघ काहीसा दुर्दैवीही ठरला. कारण आॅस्ट्रेलियाला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर डकवर्थ लुइस नियमानुसार भारताला लक्ष्य थोडे मोठे मिळाले. त्यामुळे भारताला फटका बसला. पण माझ्या मते कारणे दिली जाऊ नयेत. विजयासाठी भारताने खूप चांगले प्रयत्न केले खरे; पण हे प्रयत्न अपुरे पडले.
या पराभवातून काही गोष्टी समोर आल्या. पहिले म्हणजे भारताचे क्षेत्ररक्षण खूप सुमार झाले. कर्णधार विराट कोहलीनेही एक झेल सोडला. आॅस्ट्रेलियाने तब्बल ९ षटकार मारले. त्यामुळे कुठेना कुठे गोलंदाजीतही कमतरता राहिली. या सर्व गोष्टींचा परिणाम नक्कीच झाला आहे. विराट कोहलीविषयी म्हणायचे झाल्यास गेल्या काही काळामधील हा त्याचा वाईट दिवस होता. हा असा दिवस असा होता की, जिथे त्याच्याकडून झेल सुटला, धावा झाल्या नाहीत आणि सामनाही गमावला. मोठ्या खेळाडूंचे झेल सुटणे खूप महागात पडते. शिवाय आॅस्ट्रेलियातील मैदाने आकाराने खूप मोठी असतात, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणे भारतासाठी आव्हानात्मक आहे. त्याचबरोबर कृणाल पांड्या आणि खलील अहमद यांच्या अनुभवातील कमतरता या वेळी स्पष्टपणे दिसून आली.
पण तरीही हा पराभव केवळ ४ धावांच्या अंतराने झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये फारसा फरक नाही, याकडेही लक्ष द्यावे लागेल. त्यामुळेच आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये
भारत बाजी मारू शकतो, अशी शक्यता आहे. शिखर धवनने या सामन्यात महत्त्वाची खेळी केली. त्याच्यामुळे आपण विजयाजवळ पोहोचलो. नंतर दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांनीही योगदान दिले. धवन असा फलंदाज आहे की, एकदा तो टिकला तर त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण करणे कठीण होऊन जाते. माझी सर्वाधिक निराशा केली ती लोकेश राहुलने. त्याला सलग संधी मिळत आहे, पण त्याचा फायदा त्याला उठवता येत नाहीये. कोहलीही अपयशी ठरला, पण असे खूप क्वचित पाहायला मिळते.
जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून कोहलीवर दबाव असणारच. कारण त्याच्याकडून कायम मोठ्या खेळीची अपेक्षा असते. पण एक गोष्ट सर्वांना माहीत आहे की, दबावामध्ये त्याचा खेळ अधिक खुलतो. अर्थात बुधवारचा दिवस यासाठी अपवाद ठरला. आता उर्वरित सामन्यांसाठी भारताने क्षेत्ररक्षणावर अधिक भर द्यायला हवा.

Web Title: India's fielders have a poor performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.