मुंबई - आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोरील संकट वाढतच चालले आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील दुस-या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षणासाठी मैदानातच उतरला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे विराटने क्षेत्ररक्षण करण्याचे टाळले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या तिस-या कसोटीत विराट खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र BCCI कडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तिस-या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी करताना इंग्लंडला तिस-या दिवसअखेर 250 धावांची आघाडी मिळवून दिली. तिस-या दिवसाच्या अखेरच्या सत्रातही विराट बराच काळ सीमारेषेबाहेर बसून होता. पुरेशा विश्रांतीनंतर तो चौथ्या दिवशी मैदानात परतेल असे वाटले होते, परंतु त्याने विश्रांती करणेच पसंत केले. भारताच्या दुस-या डावातही दोन फलंदाज माघारी परतूनही कोहली फलंदाजीसाठी आलाच नाही.