India has a golden opportunity to win the World Cup, but there will be a lack of experienced players | 'भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची सुवर्ण संधी, पण अनुभवी खेळाडूंची उणीव भासणार'
छाया : सुशील कदम

ठळक मुद्देभारतात 1982 व 2010 नंतर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होत आहे.हॉकीची पंढरी होऊ पहाणाऱ्या भुवनेश्वर येथे बुधवारपासून या स्पर्धेला सुरुवात होईल.द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

मुंबई, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतात 1982 व 2010 नंतर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होत आहे. हॉकीची पंढरी होऊ पहाणाऱ्या भुवनेश्वर येथे बुधवारपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. पण भारतात झालेल्या दोन विश्वचषक स्पर्धेत यजमानांच्या बाबतीत जे निकाल अनुभवायला मिळाले, तसे यंदा मिळणार नाही. भारतीय संघाचे सातत्य पाहता यंदा घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची ही सुवर संधी असल्याचे मत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो यांनी व्यक्त केले. या युवा संघावर विश्वास दाखवताना त्यांनी अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवणारी असेल, असे स्पष्ट मतही व्यक्त केले. 

भारताने अखेरचा आणि एकमेव विश्वचषक 1975 साली मलेशियात उंचावला होता. त्यानंतर त्यांना अंतिम चारमध्येही प्रवेश मिळवता आलेला नाही. त्यामुळे या युवा संघाकडून अनेकांना जेतेपदाच्या अपेक्षा आहेत. त्यात लोबो यांचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले," हा भारतीय संघ हा सर्वोत्तम आहे. युवा खेळाडूंनी भरलेला. या संघाची बचावफळी इतकी सक्षम आहे कीं, आक्रमणपटूंचा निम्मा भार करून टाकते. हरमनप्रीत सिंग, कोठाजीत( खडंगबाम) , सुरेंदर ( कुमार), लाक्रा ( बिरेंदर) यांना चकवणे अवघड आहे." 

भारतीय संघाची घोडदौड उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पक्की असल्याचे सांगताना बाद फेरीत अनुभवी खेळाडूची उणीव जाणवेल, असे लोबो यांनी सांगितले. ते म्हणाले," दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा यांना भारतीय संघ सहज नमवतो. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश नक्कीच आहे. गटात बेल्जियमविरूध्द काय निकाल लागतो यावर पुढील गणित अवलंबून आहे. जर गटात अव्वल आलो मग उपांत्य फेरीही निश्चित, पण तसे न झाल्यास आपल्याला बलाढ्य संघाविरुद्ध खेळावे लागेल. अशावेळी युवा खेळाडूंची मानसिक तयारी महत्त्वाची ठरेल. सरदारा सिंग, एस व्ही सुनील, रुपिंदर पाल सिंग या अनुभवी खेळाडूंचे असणे बाद फेरीसाठी फायद्याचे ठरले असते."


मनप्रीत सिंग दिल से खेळतो, श्रीजेश हुकुमी एक्का... 
भारतीय संघाची धुरा मनप्रीत सिंगच्या खांद्यावर आहे. तो खेळताना दुखापत वगैरे बघत नाही. त्याच्यासाठी आधी खेळ आणि नंतर दुखापतीकडे लक्ष.. तो मनापासून खेळतो.. तो आणि पी आर श्रीजेश हे दोन हुकुमी एक्के आहेत. त्यांच्यावरच भारताची मदार अवलंबून आहे, असे लोबो यांनी सांगितले.

बेल्जियम डार्क हॉर्स असेल
यंदाच्या स्पर्धेत जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, आर्जेन्टिना, हॉलंड या संघांचा खेळ पाहण्यासारखा असेल. यांच्यातील एक जेतेपदाचा चषक नक्की उंचावेल, परंतु बेल्जियम हा डार्क हॉर्स आहे. त्यांच्या रणनीतीचा अंदाज बांधणे अवघड आहे. ते यंदा करिष्मा करतील, असे भाकित लोबो यांनी केले.


Web Title: India has a golden opportunity to win the World Cup, but there will be a lack of experienced players
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.