IND vs AUS 1st Test: Head is India's headache; Australia 7 for 191 | IND vs AUS 1st Test : हेड ठरला भारतासाठी डोकेदुखी; ऑस्ट्रेलिया ७ बाद 191
IND vs AUS 1st Test : हेड ठरला भारतासाठी डोकेदुखी; ऑस्ट्रेलिया ७ बाद 191

ठळक मुद्देइशांत शर्माने आरोन फिंचला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.


अ‍ॅडिलेड: अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला झटपट बाद केले. तसेच, दुसरीकडे जसप्रीत बुमराहसह इतर वेगवान गोलंदाजांनी ऑसीच्या धावांवर अंकुश लावल्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने शानदार पुनरागमन केले.
ऑस्ट्रेलियाने अखेरच्या सत्रात ट्रॅव्हिस हेड(नाबाद ६१)आणि पॅट कमिन्स(१०)अर्धशतकी भागीदारी केली खरी, पण कमिन्स बाद होताच भारताने पुन्हा पकड घट्ट केली. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ८८ षटकात ७ बाद १९१ अशी वाटचाल केली होती. अश्विनने ३३ षटकांत ५० धावांत तीन गडी बाद केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३४ तसेच ईशांतने ३१ धावांत प्रत्येकी दोन बळी घेतले. मिशेल स्टार्क(८)हा हेडसह खेळपट्टीवर होता. भारताच्या पहिल्या डावातील २५० धावांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलिया अद्याप ५९ धावांनी मागे असून तीन फलंदाज शिल्लक आहेत.
चहापानानंतर यजमानांनी दहा धावांत दोन गडी गमावले. बुमराहने हॅन्डर्सेकोम्ब(३४) याला बाद करीत बळी घेण्यास सुरुवात केली. ईशांतने कर्णधार टिम पेन(५) याला बाद करताच ६ बाद १२७ अशी स्थिती होती. नंतर हेड-कमिन्स यांनी अर्धशतकी भागीदारी केली. हेडने कसोटीतील दुसरे अर्धशतक १०३ चेंडूत गाठले. कमिन्सला बुमराहने पायचित केले. शॅन मार्श(२) आणि उस्मान ख्वाजा(२८), हे अश्विनचे बळी ठरले. वेगवान गोलंदाजांनी आज वेगाचा विक्रम नोंदविला. बुमराहने १५० किमी प्रतितास वेगाने मारा केला.  

त्याआधी, मोहम्मद शमी (६) हा हेजलवूडच्या पहिल्याच चेंडूवर बाद होताच भारताचा पहिला डाव २५० धावांवर संपला. हेजलवूडने ५२ धावांत तीन तसेच मिशेल स्टार्क, पॅड कमिन्स आणि नाथन लियोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
यजमान ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात दमदार खेळीची अपेक्षा होती. मात्र इशांत शर्माने पहिल्याच षटकात प्रमुख फलंदाज अ‍ॅरोन फिंचच्या यष्ट्या उखडवून टाकताना कांगारुंचे मानसिक खच्चीकरण केले. यानंतर मार्कस हॅरीस आणि उस्मान ख्वाजा यांनी ४५ धावांची भागीदारी केली खरी, परंतु, अश्विनच्या फिरकीपुढे ऑसीची आघाडी फळी ढेपाळली. हॅरीसला बाद करुन अश्विनने ही जोडी फोडली. यानंतर त्याने शॉन मार्श आणि ख्वाजा यांनाही माघारी धाडत यजमानांची ४ बाद ८७ अशी अवस्था केली.
पीटर हँड्सकोम्ब आणि ट्राविस हेड यांनी पाचव्या गड्यासाठी ३३ धावांची भागीदारी केली. यावेळी जसप्रीत बुमराहने हँड्सकोम्बला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर कर्णधार टीम पेन (५) आणि पॅट कमिन्स (१०) हेदेखील स्वस्तात बाद झाल्याने ऑसी संघ दडपणाखाली आला. मात्र, हेडने १४९ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ६१ धावांची संयमी खेळी केल्याने ऑस्ट्रेलियाला आपली बाजू काहीप्रमाणात सुधारता आली. तिसºया दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरणार असून सामन्यात आघाडी कोण घेणार याची उत्सुकता लागली आहे. >धावफलक :
भारत (पहिला डाव) : ८८ षटकात सर्वबाद २५० धावा.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : अ‍ॅरोन फिंच त्रि. गो. ईशांत ०, मार्कस् हॅरिस झे. विजय गो. अश्विन २६, उस्मान ख्वाजा झे. पंत गो. अश्विन २८, शॅन मार्श त्रि. गो. अश्विन २, पीटर हॅन्डस्कोम्ब झे. पंत गो. बुमराह ३४, ट्रॅव्हिस हेड खेळत आहे ६१, टिम पेन झे. पंत गो. ईशांत ५, पॅट कमिन्स पायचित गो. बुमराह १०, मिशेल स्टार्क खेळत आहे ८, अवांतर १७, एकूण: ८८ षटकांत ७ बाद १९१ धावा.
गडी बाद क्रम : १/०, २/४५, ३/५९, ४/८७, ५/१२०, ६/१२७, ७/१७७.
गोलंदाजी : ईशांत शर्मा १५-६-३१-२, जसप्रीत बुमराह २०-९-३४-२, मोहम्मद शमी १६-६-५१-०, रविचंद्रन अश्विन ३३-९-५०-३, मुरली विजय ४-१-१०-०.


Web Title: IND vs AUS 1st Test: Head is India's headache; Australia 7 for 191
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.