ICC World Cup 2019 : 1996 नंतर प्रथमच क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता

यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत खास ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 09:45 PM2019-07-11T21:45:43+5:302019-07-11T21:53:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: New world champion for cricket after first time since 1996 | ICC World Cup 2019 : 1996 नंतर प्रथमच क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता

ICC World Cup 2019 : 1996 नंतर प्रथमच क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत खास ठरणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये एकदाही विश्वचषक न जिंकलेले संघ खेळणार आहेत. त्यामुळे यंदा क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे 1996 नंतर प्रथमच एखादा नवा संघ विश्वचषक उंचावताना दिसणार आहे. 

आतापर्यंत केवळ वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाचच संघांना विश्वचषक जिंकता आलेला आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने तब्बल पाचवेळा तर वेस्ट इंडिज आणि भारताने प्रत्येकी दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक वेळा एकदा विश्वचषक जिंकला आहे. मात्र या विश्वचषक स्पर्धेत माजी विश्वविजेत्यांपैकी कुठलाही संघ अंतिम फेरीत पोहोचला नसल्याने क्रिकेटला इंग्लंड किंवा न्यूझीलंडच्या रूपात सहावा विश्वविजेता मिळणार आहे. 

आज झालेल्या दुसऱ्या उपंत्य लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. क्रिकेट विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. याआधी 1979, 1987 आणि 1992 मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळा त्यांना विश्वविजेतेपद मिळवण्यात अपयश आले होते. 


तर दुसरीकडे न्यूझीलंडनेही बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची न्यूझीलंडची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. 

आतापर्यंत झालेल्या क्रिकेट विश्वचषकांचा इतिहास पाहिल्यास 1975 मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून पहिले विश्वविजेते होण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर 1979 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. पुढे 1983 मध्ये भारताने धक्कादायक निकालाची नोंद करताना वेस्ट इंडिजला पराभूत करत विश्वचषक जिंकणारा दुसरा संघ होण्याचा मान मिळवला होता. 

त्यानंतर 1987 च्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमने-सामने आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडला पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावणारा तिसरा संघ ठरला होता. पुढे 1992 च्या विश्वचषकात पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत करत विश्वचषक जिंकणारा चौथा संघ ठरला होता. तर 1996 मध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विश्वविजेता होणारा पाचवा संघ बनण्याचा मान मिळवला. पुढे 1999, 2003, 2007 आणि 2015 च्या विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. तर 2011 मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती.   
 

Web Title: ICC World Cup 2019: New world champion for cricket after first time since 1996

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.