ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानविरुद्घच्या पराभवाचा सर्व राग यजमान इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशवर काढल्याचे पाहायला मिळाले. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी 128 धावांची सलामी देत इंग्लंडला मजबूत पाया उभा करून दिला. त्यानंतर अन्य फलंदाजांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले आणि बांगलादेशसमोर विजयासाठी 387 धावांचे अश्यक्य आव्हान उभे केले. इंग्लंडने 6 बाद 386 धावांची खेळी करताना वर्ल्ड कप स्पर्धेतील संघासाठी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला. पण, क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी त्यांना एक धक्का बसला. बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या फलंदाजाला दुखापतीमुळे मैदानावर उतरताच आले नाही.
![]()
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रॉय आणि बेअरस्टो या जोडीनं बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना 15 षटकांत शतकी भागीदारी केली. 20व्या षटकात बांगलादेशला ही जोडी फोडण्यात यश आले. बेअरस्टो 50 चेंडूंत 6 चौकारासह 51 धावा करून माघारी परतला. बेअरस्टो माघारी परतल्यानंतर जेसन रॉयनं जोरदार फटकेबाजी केली. त्यानं वन डे क्रिकेटमधील 9वे शतक झळकावले, तर वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. रॉयनं 121 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकार खेचून 153 धावांची खेळी केली. र जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी दमदार खेळ करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. बटलरने अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी 95 धावांची भागीदारी केली. बटलर 44 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 64 धावांवर माघारी परतला.
लायम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 45 धावांची भागीदारी करताना संघाला 6 बाद 386 धावांचा पल्ला गाठून दिला. मॉर्गनने 35 धावा केल्या. पण, क्षेत्ररक्षणाला येण्यापूर्वी इंग्लंडच्या जोस बटलरला दुखापत झाली. उजव्या पायाचे स्थायू ताणल्याने तो यष्टिरक्षणासाठी मैदानावर उतरला नाही. त्याच्याजागी जॉनी बेअरस्टोनं यष्टिरक्षण केले.