गौतमने घेतलेल्या ‘गंभीर’ निर्णयाने लक्ष वेधले

संघव्यवस्थापन किंवा मेंटॉर रिकी पाँटिंग यांनी गंभीरवर काही दबाव टाकला आहे का, याबाबत किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:03 AM2018-04-27T00:03:03+5:302018-04-27T00:03:03+5:30

whatsapp join usJoin us
Gautam pointed out the 'serious' decision taken by him | गौतमने घेतलेल्या ‘गंभीर’ निर्णयाने लक्ष वेधले

गौतमने घेतलेल्या ‘गंभीर’ निर्णयाने लक्ष वेधले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीर याने आपल्या पदाचा दिलेला राजीनामा या आठवड्यातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी ठरली. स्वत:ची आणि संघाची ढासळलेली कामगिरी पाहून त्याने हा निर्णय घेतला. संघाने सहापैकी ५ सामने गमावले, तसेच गंभीरचा स्वत:चा फॉर्मही खालावला आहे. विशेष म्हणजे त्याने फ्रेंचाइजीकडून मानधन घेणार नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे वैयक्तिकरीत्या हा खूप मोठा निर्णय आहे. पण त्याचवेळी हा निर्णय घेण्यासाठी त्याला दबावात आणले का, हेदेखील पाहावे लागेल. कारण याविषयी खूप चर्चाही रंगत आहे. संघव्यवस्थापन किंवा मेंटॉर रिकी पाँटिंग यांनी गंभीरवर काही दबाव टाकला आहे का, याबाबत किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते ही एक प्रक्रिया बनू शकते. कारण आपल्याला विसरता कामा नये की, याआधीही शिखर धवनला हैदराबाद सनरायझर्सचे नेतृत्व सोडावे लागले होते. रिकी पाँटिंगनेही मध्यावरच कर्णधारपद सोडले होते. एकूणच चांगली कामगिरी करण्याबाबत खेळाडूंवर भविष्यात खासकरून कर्णधारावर फ्रेंचाइजी मालक आणि टीकाकारांकडून खूप दबाव असेल. त्यामुळे माझ्या मते आता कर्णधारांवर खूप मोठे नियंत्रण असेल, स्वत:सह संघाची कामगिरी उंचावण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. जर कर्णधार चांगले प्रदर्शन करत नसेल, तर पूर्ण जबाबदारी त्याच्यावरच जाईल. आता गंभीरबाबत म्हणायचे झाल्यास, एक फलंदाज म्हणून तो अजून खेळू शकतो, पण आता श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी आली आहे.
संघाच्या कामगिरीविषयी सांगायचे झाल्यास, चेन्नई सुपरकिंग्ज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. भलेही त्यांनी सहापैकी ४ सामने अखेरच्या षटकात जिंकले, पण शेवटचा सामना जो झाला, त्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध मिळवलेला विजय सर्वात हटके ठरला. या सत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला. आरसीबीने २०५ धावा केल्यानंतर चेन्नईने ७२ धावांवर ४ बळी गमावल्यानंतरही बाजी मारली. ज्याप्रकारे अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनी खेळले त्याला तोड नाही. या खेळीनंतर निवडकर्त्यांची नजर नक्कीच रायडूवर पडली असेल. दुसरीकडे, धोनीने सर्वच टीकाकारांना गप्प केले. तो आजही सर्वोत्कृष्ट फिनिशरपैकी एक असल्याचे त्याने सिद्ध केले. विराट कोहलीच्या संघाची वाटचाल सुमार होत असून त्याहून सुमार वाटचाल रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सची आहे. एकूणच आयपीएलमध्ये भारताचे कर्णधार व उपकर्णधार मागे पडले आहेत. शिवाय दोघांचा फॉर्मही विशेष राहिला नाही. मुंबईची फलंदाजी कमजोर, पण गोलंदाजी मजबूत आहे. दुसरीकडे आरसीबीची गोलंदाजी कमजोर आहे. जर तुम्हाला २०५ धावांचे संरक्षण करता येत नसेल, तर गोलंदाजांवर नक्कीच प्रश्न उभे राहतात. आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या दोन्ही संघांना आपले उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. हे आव्हान नक्कीच कठीण आहे, पण अशक्य अजिबात नाही.

 

Web Title: Gautam pointed out the 'serious' decision taken by him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.