धवनचे अर्धशतक, भारताचा बांगलादेशवर विजय

निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील भारतानं बांगलादेशचा पराभव करत पहिला विजय नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 10:36 PM2018-03-08T22:36:28+5:302018-03-08T22:43:48+5:30

whatsapp join usJoin us
Dhawan's half century, India beat Bangladesh | धवनचे अर्धशतक, भारताचा बांगलादेशवर विजय

धवनचे अर्धशतक, भारताचा बांगलादेशवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

धवनचे अर्धशतक, भारताचा बांगलादेशवर विजय
कोलंबो - निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील भारतानं बांगलादेशचा सहा विकेटने पराभव करत पहिला विजय नोंदवला. बांगलादेशनं दिलेले 140 धावांचे आव्हान भारताने शिखर धवनच्या फटकेबाजीच्या जोरावर आठ चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. 

भारताकडून शिखर धवनने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी केली. शिखर-रोहितने 28 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच पंतही फारशी कमाल दाखवू शकला नाही. रुबेल हुसेनने त्याला सात धावांवर माघारी पाठवले. रैना आणि शिखरने त्यानंतर सामन्याची सुत्रे आपल्याहाती घेत संयमी फंलदाजी केली. रैनाने 28 धावांची उपयुक्त खेळी केली. शिखर धवनने पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्याही सामन्यात ताबोडतोप फलंदाजी केली. शिखर धवनने 2 षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. शिखर आणि रैना तंबूत परतल्यानंतर मनिष पांडे(28) आणि कार्तिक यांनी आठ चेंडू राखून भारताला विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या सामन्यातून बोध घेत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 20 षटकांत 8 फलंदाज गमावत 139 धावा करता आल्या. बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. जयदेव उनाडकटने सौम्य सरकारला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले, तर शार्दुल ठाकूरने तमीम इक्बालचा काटा काढला. विजय शंकरच्या सातव्या षटकामध्ये लिटॉन दासला 7 आणि 8 या धावसंख्येवर दोनदा जीवदान मिळाले. पण युजवेंद्र चहलने दासला (34) सुरेश रैनाकरवी झेलबाद केले. दासला तंबूत धाडल्यावर भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचे काम चोख बजावले. अखेरच्या काही षटकांमध्ये सब्बीर रहमानने फटकेबाजी करत धावसंख्येमध्ये 30 धावांची भर टाकली. उनाडकटने आपल्या अखेरच्या षटकात त्याला तंबूचा रस्ता दाखवला.


भारताकडून जयदेव उनाडटकने सर्वाधिक तीन बळी मिळवले. विजय शंकरच्या गोलंदाजीवर दासला दोनदा जीवदान मिळाले असले तरी त्याने बांगलादेशच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यात जास्त धावा देणाऱ्या शार्दुलने बांगलादेशविरुद्ध 4 षटकांमध्ये 25 धावांमध्ये एक बळी मिळवला.

 

Web Title: Dhawan's half century, India beat Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.