बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार?

रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:38 PM2019-07-15T12:38:46+5:302019-07-15T13:00:38+5:30

whatsapp join usJoin us
BCCI To Check On Virat Kohli Rohit Sharma Rift looking for split Captaincy | बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार?

बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: विश्वचषक स्पर्धेत झालेला पराभव, त्यानंतर समोर आलेल्या संघातील गटबाजीच्या बातम्या या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयनं पुढील स्पर्धेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. भारतीय संघात विराट आणि रोहित असे दोन गट असल्याचं वृत्त गेल्याच आठवड्यात समोर आलं. त्यानंतर आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून गांभीर्यानं सुरू आहे. 

संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळणारा भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. यानंतर आता बीसीसीआयकडून संघाचा कर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्यानं आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना तसे स्पष्ट संकेत दिले. 'चांगले संघ एक स्पर्धा संपल्यावर लगेचच पुढच्या स्पर्धेची तयारी करू लागतात. इंग्लंडनं जिंकलेला विश्वचषक हे त्याचंच उदाहरण आहे. त्यामुळेच पुढील स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत करुन भारत तयारीला लागेल. त्यासाठी रोहितकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो संघाचं नेतृत्व करु शकतो. तर कोहलीकडे कसोटी संघाची धुरा कायम ठेवली जाऊ शकते,' असं पदाधिकाऱ्यानं सांगितलं. 

भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा योग्य असल्याचं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यानं म्हटलं. 'एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्मानं त्याच्या खांद्यावर घ्यावी. सध्या यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. रोहितनं नेतृत्व स्वीकारल्यास पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल,' अशा शब्दांत पदाधिकाऱ्यानं रोहितसाठी बॅटिंग केली. सध्या अनेक गोष्टींकडे नव्यानं पाहण्याची गरज आहे. या परिस्थितीसाठी रोहित शर्मा अतिशय योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. संघात विराट आणि रोहित असे दोन गट असल्याच्या चर्चा अतिशय त्रासदायक आहेत, असंही ते पुढे म्हणाले. 

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक निर्णयांवरुन मतभेद असल्याचं वृत्त हिंदी दैनिक 'जागरण'नं शनिवारी दिलं. टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसून गटबाजी सुरू असल्याचं जागरणनं आपल्या वृत्तात म्हटलं होतं. कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एककल्ली कारभारावर आणि संघ निवडीवर काही खेळाडू नाराज होते. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्रींनी निर्णय घेतले. यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर परिणाम झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. संघात विराट आणि रोहित असे दोन गट पडले आहेत. विराटच्या गटातील खेळाडूंना सर्वाधिक संधी दिली जाते, संघ निवड करताना पक्षपात केला जातो, असा दावा करताना टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाचा दाखला देण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली. त्यासाठी अंबाती रायुडूला डावलण्यात आलं, असं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Web Title: BCCI To Check On Virat Kohli Rohit Sharma Rift looking for split Captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.