मुंबई, आशिया चषक 2018 : उत्तम गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजांनी जबाबदारीने केलेला खेळ, याच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांना समाधानकारक लक्ष्य उभारता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ 162 धावांवर माघारी परतला. भारताने हे लक्ष्य अवघ्या 29 षटकांत पूर्ण करताना विजयी मालिका कायम राखली. भारताने आठ विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने पाकिस्तानवर नोंदवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला.
भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी यावेळी प्रत्येकी तीन बळी मिळवले. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करत रोहित शर्माने अर्धशतक झळकावत विजयात मोलाची भूमिका बजावली. रोहितने 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. शिखर धवनने 46 धावा करत रोहितला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी नाबाद 31 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने आठ विकेट आणि 126 चेंडू राखून पाकिस्तानला नमवले.
पाकिस्तानवर चेंडू राखून मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. भारतीय संघाने 2006 चा विक्रम मोडला. 2006मध्ये मुलतान येथे झालेल्या वन डे सामन्यात भारताने 5 विकेट आणि 105 चेंडू राखून विजय मिळवला होता. हा आत्तापर्यंतचा चेंडूच्या फरकाने मिळवलेला सर्वात मोठा विजय होता. तो विक्रम बुधवारी मोडला गेला.