रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशी घ्यावी काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 08:01 PM2019-04-08T20:01:27+5:302019-04-08T20:03:28+5:30

सूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय

The volunteers walking around in the sunlight should take care of this | रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशी घ्यावी काळजी

रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशी घ्यावी काळजी

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांचा सल्ला, जास्त पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा

औरंगाबाद : शहरात लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे आणि तसा तापमानाचा पाराही चढू लागला आहे. अशावेळी रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा उष्माघाताचा फटका बसलाच समजा. त्यामुळे कार्यकर्त्यांनी योग्य काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचारात कार्यकर्त्यांची फौज ही सर्वांत महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत. त्यांच्याकडून भर उन्हात एक-एक भाग पिंजून काढला जात आहे. शहरात एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासून पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. उन्हामुळे अनेकांकडून प्रचारासाठी सकाळी व सायंकाळच्या वेळेला प्राधान्य दिले जात आहे, तर अनेक जण उन्हाची कोणतीही पर्वा करताना दिसत नाही. रणरणत्या उन्हात प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण करीत आहे; परंतु उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. उष्माघाताबरोबर सौम्य उष्माघाताचाही (माईल्ड सनस्ट्रोक) धोका असतो. त्यामुळे उन्हात फिरताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. नाही तर उन्हाच्या चटक्याने आरोग्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.

खबरदारी घ्यावी
उन्हामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. सर्वात मोठा धोका उष्माघाताचा असतो. उष्णतेमुळे व्यक्तीला थकवा येतो. तापमान वाढल्यावर शरीरातून घाम येतो.  त्यातून शरीराचे तापमान वाढून जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. या पाण्यात ग्लुकोज, मीठ टाकले पाहिजे. मधुमेह, हायपरटेन्शन असणाऱ्या तसेच ज्येष्ठांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. 
-डॉ. गजानन सुरवाडे, फिजिशियन आणि प्रभारी विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, घाटी

तापमान वाढणार
उन्हामध्ये आगामी दिवसात आणखी वाढ होईल. हवामान कोरडे राहील. तापमान साधारणपणे ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानाच्या सरासरीत वाढ होत आहे. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
 -किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ, हवामान अभ्यासक

हे कराल तर वाचाल?
- उन्हात फिकट रंगाचे आणि सैल कपडे परिधान केले पाहिजे. डोक्यावर टोपी, रुमाल वापरला पाहिजे. टोपीला छिद्रे असणे आवश्यक असते. 
- उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीराचे तापमान वाढते. त्यातून व्यक्तीला दम लागतो. उन्हात चक्कर आली, थकवा अधिक जाणवायला लागला तर विश्रांती घ्यावी.
- उन्हाचा त्रास जाणवत असेल तर थंड पाणी प्यावे. अधिक त्रास होत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. शरीरातील मूलद्रव्य पाण्याद्वारे भरून काढावे. त्यासाठी जलसंजीवनीचे (ओआरएस) पाणी द्यावे.
- उन्हामुळे व्यक्ती जर बेशुद्ध झाला असेल, तर रुग्णालयात दाखल करावे. प्रचारासाठी सकाळी अथवा सायंकाळच्या वेळेला प्राधान्य द्यावे.  बाहेरचे खाणे-पिणे कटाक्षाने टाळावे.

Web Title: The volunteers walking around in the sunlight should take care of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.