महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

By विकास राऊत | Published: April 11, 2024 12:25 PM2024-04-11T12:25:08+5:302024-04-11T12:26:42+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये नेमके काय राजकारण शिजतंय, यावरून कुणीही थेट बोलण्यास तयार नाही.

The seat allocation in the Mahayuti is still going on; BJP officials along with Bhagwat Karad stayed in Mumbai | महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेसेनेला जाणार की भाजपाला, याचा तिढा गुढीपाडवा होऊनही सुटला नाही. पाडव्याला सायंकाळपर्यंत गोड बातमी येईल, असा दावा भाजपच्या गोटातून करण्यात आला होता; परंतु काहीही बातमी आली नाही. त्यामुळे जागा वाटपावरून अजूनही खल सुरूच आहे, असे दिसते. दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह शहराध्यक्ष शिरीष बोराळकर व इतर बुधवारी दिवसभर मुंबईत तळ ठोकून होते. डॉ. कराड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर बोराळकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, वैयक्तिक कामानिमित्त मी मुंबईला आलो आहे.

दुसरीकडे आ. प्रशांत बंब यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आ. बंब यांना मुख्यमंत्री भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, नगरविकास खात्यांकडून अडविण्यात आलेल्या कामांबाबत बोललो. मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यावी, यावर मी कसे काय बोलणार? परंतु उमेदवारीचा निर्णय लवकरच घ्यावा, अशी ओझरती चर्चा भेटीत झाली. या जागेवरून महायुतीमध्ये नेमके काय राजकारण शिजतंय, यावरून कुणीही थेट बोलण्यास तयार नाही. चर्चेचे गुऱ्हाळ १८ एप्रिलपर्यंत सुरू राहते की काय, असे बोलले जात आहे.

आज निर्णय
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाला सुटणार याचा निर्णय गुरुवारी होईल. शिंदे सेनेला जागा सुटेल. उमेदवार कुणीही असेल.
- आ. संजय शिरसाट, प्रवक्ता, शिंदे सेना

Web Title: The seat allocation in the Mahayuti is still going on; BJP officials along with Bhagwat Karad stayed in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.