सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान

By विकास राऊत | Published: March 28, 2024 05:31 PM2024-03-28T17:31:09+5:302024-03-28T17:31:54+5:30

२०१९ साली झाला होता खैरे यांचा पराभव :  २०१४ पासून लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा ठेवून असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना यावेळी देखील उमेदवारीने हुलकावणी दिली.

Shiv sena UBT trusted Chandrakant Khairen for the sixth time for Lok sabha election; Mahayuti, MIM will be the challenge | सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान

सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली. सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात खैरे उतरणार असून २०१४ पासून लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा ठेवून असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना यावेळी देखील उमेदवारीने हुलकावणी दिली. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली.

राज्यातील १७ उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी सकाळी जाहीर केली. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महायुतीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला जाणार की, शिंदे गटाला हेच अद्याप ठरले नाही. या मतदासंघात शिवसेना शिंदेगट आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने येतात की, भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने लढतात, हे या आठवड्यात स्पष्ट होऊ शकते.

१९९९ साली खैरे यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली. त्यानंतर २०१४ पर्यंत ते सतत विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीमध्ये एमआयएम, अपक्ष आणि शिवसेना-भाजपा युती अशी तिरंगी लढत होऊन खैरेंचा पराभव झाला.

उमेदवारी मिळाल्यानंतर खैरे काय म्हणाले?
माझ्यावर पक्षाने खूप विश्वास दाखविला आहे. सर्व सहकारी नेत्यांनी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला आहे. माझ्यावर टाकलेली जबाबदारी निश्चितपणे पार पाडणार आहे. एकनिष्ठपणाचा हा विजय आहे. उमेदवारीसाठी काही प्रमाणात संघर्षही करावा लागला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे उमेदवारी निश्चित झाली. उमेदवारीसाठी दानवेंचे आव्हान होते, यावर खैरे म्हणाले, तिकीट अंतिम झाले आहे. आता कुणीही एकमेकाच्या विराेधात नाही, शिवसेनेची शिस्त आहे. दानवे आणि मी एकत्र काम करू. शिंदे गट गद्दार आहे. आम्ही एकनिष्ठ आहोत. एमआयएमचे देखील काहीही आव्हान वाटत नाही.

नाराज दानवे काय म्हणाले?
पक्षप्रमुखांनी सर्वांची मते जाणून घेत निर्णय घेतला आहे. दिल्ली गाठण्यासाठी पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, ते सक्षम आहेत. २०१४ पासून आजवर मी इच्छुक होतो. पक्षप्रमुखांनी निर्णय घेतल्यानंतर तो शिरसावंद्य मानून काम करणार. विरोधी पक्षनेता ही मोठी जबाबदारी माझ्यावर असून राज्यातील सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असतील. इथल्यापुरता मी मर्यादित नाही.

१९९९ लोकसभा निवडणूक निकाल
चंद्रकांत खैरे (शिवसेना) : ३८१२७०
ए.आर.अंतुले (काँग्रेस): ३२५९४३

२००४ निकाल
चंद्रकांत खैरे (शिवसेना) :४७७९००
रामकृष्ण बाबा पाटील (काँग्रेस) :३५५९७७

२००९ निकाल
चंद्रकांत खैरे (शिवसेना) :२५५८९६
उत्तमसिंग पवार (काँग्रेस) : २२२८८२

२०१४ निकाल
चंद्रकांत खैरे (शिवसेना) :५२०५५९
नितीन पाटील (काँग्रेस) :३५८८१२

२०१९ लोकसभा निवडणूक
मनपा विरोधी पक्षनेते, आमदार आणि खासदार असा ३६ वर्षांचा राजकीय प्रवास केल्यानंतर खैरे यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खैरे यांना पराभवाची धूळ चारली. जलील यांना ३ लाख ८८ हजार ६९९ मते मिळाली. खैरे यांना ३ लाख ८३ हजार १२७ मते मिळाली होती. जलील यांनी ५ हजार ८३० मतांनी खैरे यांचा पराभव केला. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ६६ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांना ९१ हजार ६३४ मते मिळाली होती.

मी खैरेंचा नव्हे, पक्षाचा प्रचार करणार
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली असली तरी मी खैरेंचा अथवा कोणा व्यक्तीचा नव्हे, तर शिवसेनेचा प्रचार करणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. खैरेंचा प्रचार का करणार नाही, यावर दानवे म्हणाले, मी निष्ठावान शिवसैनिक आहे. मीदेखील उमेदवारी मागितली होती. पण, पक्षाने खैरेंना संधी दिली. ठीक आहे. पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून मी शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करणार. माझ्यासाठी व्यक्ती नव्हे तर पक्ष महत्त्वाचा आहे.
---अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता

शिरसाटांनी दिली दानवेंना ऑफर
दानवेंची त्यांच्या पक्षात घुसमट होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे. त्यांचे आम्ही स्वागतच करू, अशा शब्दात शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी दानवेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शिरसाट म्हणाले, पक्षाकडून आपल्याला डावलले जात आहे, असे दानवे यांना वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे. दानवेंना उमेदवारी देणार का, असे विचारले असता शिरसाट यांनी याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे सांगून थेट उत्तर टाळले.

दानवे यांचे तळ्यात-मळ्यात!
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा चंद्रकांत खैरे यांना संधी दिल्यामुळे नाराज असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे येत्या काही दिवसांत वेगळी भूमिका घेणार का, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. खैरे यांना उमेदवारी मिळाली असली तरी मी त्यांचा नव्हे, तर पक्षाचा प्रचार करणार, हे दानवे यांचे विधान तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली ऑफर आणि विनोद पाटील यांनी घेतलेली भेट पाहता, दानवे वेगळ्या पर्यायाच्या शोधात तर नाहीत ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Web Title: Shiv sena UBT trusted Chandrakant Khairen for the sixth time for Lok sabha election; Mahayuti, MIM will be the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.