ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

By मुजीब देवणीकर | Published: April 20, 2024 11:44 AM2024-04-20T11:44:53+5:302024-04-20T11:46:25+5:30

नेत्यांकडून मनधरणी सुरू; एकाचा राजीनामा, अन्य आठ तयारीत

On the eve of Lok Sabha elections, former corporators in 'MIM' flag of rebellion! | ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षात सर्व काही आलबेल नाही. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील नऊ माजी नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उंचावला. त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली असून, डॅमेज कंट्रोलसाठी स्थानिक नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बंडखोरीच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू केली. मात्र, अद्याप यश आलेले नाही. पुढील काही दिवसांत आम्ही अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यातील एका बंडखोराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

२०१५ मध्ये पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने महापालिकेची निवडणूक लढविली. अपेक्षेपेक्षा जास्त यश पक्षाला मिळाले. २२ पेक्षा अधिक नगरसेवक एकाच वेळी निवडून आले. शिवसेना-भाजपा युतीसमोर विरोधी पक्ष म्हणून एमआयएमला संधी प्राप्त झाली. २०२० मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. मागील चार वर्षांमध्ये काही माजी नगरसेवकांना पक्षात अजिबात किंमत मिळत नव्हती. पक्षाच्या बैठका, कार्यक्रमांनाही त्यांना निमंत्रण देण्यात येत नव्हते. वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळू लागली. आगामी मनपा निवडणुकीत त्यांना तिकीटही मिळणार नाही, अशी चर्चा उघडपणे पक्षातील नेते करू लागले. 

ज्या वॉर्डातून हे नगरसेवक निवडून आले, त्या वॉर्डातील अन्य इच्छुकांना दिवसभर आपल्यासोबत स्थानिक नेते ठेवू लागले. त्यामुळे ९ नगरसेवकांनी ऐन निवडणुकीसमोर बंडाचा झेंडा उंचावला. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली. बंडखोरीच्या तयारीत असलेल्या ९ पैकी भडकलगेटचे माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी मागील आठवड्यातच पक्षाचा राजीनामा दिला. अन्य आठ जणांच्या गुप्त बैठका सध्या सुरू असून, लवकरच ते अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

जाहीर सभेला गैरहजेरी
चार दिवसांपूर्वी पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची शहागंज येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला पूर्व विधानसभा मतदारसंघातील बहुतांश नगरसेवक गैरहजर होते. त्यांना अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश स्थानिक नेत्यांकडून मिळालेले नाहीत. त्यामुळे या भागातील नगरसेवक ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

पक्षात सर्व काही सुरळीत
पक्षात सर्व काही सुरळीत असून, कोणीही बंड केलेले नाही. विरोधकांकडून असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. एखाद्या नगरसेवकाने राजीनामा सादर केला तर बंड म्हणता येईल. आतापर्यंत पक्षाकडे काेणीही अशा पद्धतीची नाराजीही दर्शविलेली नाही. बंड नाही, उलट सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या कामात रात्रंदिवस व्यस्त आहेत.
- शहारेख नक्षबंदी, शहराध्यक्ष एमआयएम.

Web Title: On the eve of Lok Sabha elections, former corporators in 'MIM' flag of rebellion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.