मी पाहिलेली निवडणूक....आशाताई वाघमारेंच्या प्रचारात सहभागी झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 08:47 PM2019-03-29T20:47:31+5:302019-03-29T20:47:38+5:30

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो.

I have seen the election .... Im the part of Ashatai Waghamare's campaign | मी पाहिलेली निवडणूक....आशाताई वाघमारेंच्या प्रचारात सहभागी झाले

मी पाहिलेली निवडणूक....आशाताई वाघमारेंच्या प्रचारात सहभागी झाले

googlenewsNext

हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात सुरू होता. तेव्हा आशाताई वाघमारे यांच्या नेतृत्वात निजाम राजवटीच्या विरोधात खारीचा वाटा उचलता आला. देशभक्तीची गाणी म्हणून घोषणा देणे, कार्यकर्त्यांना निरोप पोहोचविणे, पत्रके वाटणे ही कामे केली. तेव्हा यातून आलेल्या आत्मविश्वासाने स्वातंत्र्यानंतरही अनेक निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होता आले. 

१९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे या वैजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढवत होत्या. औरंगाबाद शहरात माणिकचंद पहाडे उभे होते. तेव्हा हैदराबादला विधानसभा होती. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही पाच-सहा मुली फिरत होतो. लोक मुलींना प्रचारात पाहून नाव ठेवायचे. मुलींनी घराबाहेर पडणे हेच मान्य नसलेला काळ होता. आम्हाला अक्षरश: वाळीत टाकलेले होते. चांगल्या भावनेने कोणी आमच्याकडे कधी पाहिलेच नाही. तेव्हा मुलीही जास्त नव्हत्या; पण आम्हाला मात्र त्रास होत होता.

आशाताई यांच्यामुळे आम्ही सहभाग घेत होतो. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये प्रचाराच्या सभा होत. त्या सभांना महिला कधी हजरच राहत नसत. माणसेही खूप कमी प्रमाणात येत. कोणालाही त्या निवडणुकांविषयी खूप काही आस्था नव्हती. मतदानाचा हक्क बजवावा, असेही कोणाला वाटत नसे. रॉकेलवरच्या ‘पेट्रोमॅक्स’च्या उजेडात सायंकाळी सभा घेत. कमल भोरे, प्रमिला पारनेरकर या माझ्या सहकारी होत्या. पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे निवडून आल्याचे मला आठवते. अधिवेशन काळात त्या हैदराबादला जात. त्यांचेच मार्गदर्शन आम्हाला मिळे.

तेव्हाही मतदार उत्साहाने मतदान करण्यासाठी जात नव्हते. आजही परिस्थिती बदललेली नाही. फरक एवढाच आहे की, तेव्हा मतदानासाठी नागरिकांना घेऊन जावे लागे. आज मतदानासाठी घेऊन जात असतानाच पैसेही द्यावे लागतात. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी काय दिवे लावणार? असाही प्रश्न उपस्थित होत असे. उमेदवार गरीब, झोपडपट्टीतील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देऊन मतदानाला घेऊन जात होते. ही परिस्थिती स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही बदललेली नाही, याचे दु:ख होते.

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो. राजकारण कोणत्या थराला पोहोचले आहे. विकास नावाचा प्रकार कोणीच उच्चारत नाही. भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकीसह आणीबाणीपर्यंत पैसे वाटले जात नव्हते. उमेदवार किमान लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होते. आज ती परिस्थिती राहिली नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर महिलांचा  असणारा सहभाग आणि आताचा सहभाग यात कमालीचा फरक पडला आहे. तेव्हा मुली शिक्षणच घेत नव्हत्या. त्यांची लवकर लग्ने केली जात होती. आता तशी परिस्थिती उरली नाही. महिलांचाही विकास मोठ्या प्रमाणात झाला असून, अनेक महिला प्रचारात, निवडणुकीत हिरीरीने भाग घेतात. हा बदल आनंददायी आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

Web Title: I have seen the election .... Im the part of Ashatai Waghamare's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.