Flashback : आणीबाणीचा झटका, मतदारांनी दिला काँग्रेसला जोरदार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 07:49 PM2019-04-08T19:49:38+5:302019-04-08T19:53:40+5:30

सहाव्या लोकसभेत औरंगाबादमध्ये विरोधकांची प्रथमच सरशी

Flashback: voters give Congress a big blow due to Emergency in Aurangabad lok sabha | Flashback : आणीबाणीचा झटका, मतदारांनी दिला काँग्रेसला जोरदार फटका

Flashback : आणीबाणीचा झटका, मतदारांनी दिला काँग्रेसला जोरदार फटका

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसचे चंद्रशेखर राजूरकर पराभूतऔरंगाबादेतून बापू काळदाते विजयी

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या पाच निवडणुकांमध्ये औरंगाबादेतील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मताचे दान टाकले; परंतु इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लादून नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली. या झटक्याने देशभरात काँग्रेस विरोधी वाहणाऱ्या वाऱ्यात औरंगाबादकर सहभागी झाले. या मतदारसंघातून प्रथमच  भारतीय लोकदलाचे उमेदवार बापू काळदाते यांना भरघोस मतांनी विजयी केले. 

‘गरिबी हटाव’ची घोषणा देऊन १९७१ मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध १९७४ मध्ये सात पक्ष एकत्र आले व त्यांनी जनता दलाची आघाडी स्थापन केली. दरम्यान निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवून अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत २५ जून रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यांच्या या घोषणेने देशात खळबळ माजली. अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. 

मार्च १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेत देशात लोकसभेच्या सहाव्या निवडणुका घेण्यात आल्या. स्वतंत्र पार्टी, उत्कल काँग्रेस, भारतीय क्रांतीदल, सोशालिस्ट पार्टी, जनसंघ व काँग्रेसमधून फुटून निघालेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकत्रित येऊन जनता दलाची स्थापना केली. भारतीय लोकदलाच्या निवडणूक चिन्हावर देशभरात विरोधी पक्षांनी निवडणूक लढविली. औरंगाबादेतून बीएलडीची उमेदवारी बापू काळदाते यांना देण्यात आली. काँग्रेसने (आय) चंद्रशेखर राजूरकर यांना मैदानात उतरविले. 

विक्रमी मतदान 
आणीबाणी व त्याच्या जोडीला पुरुषांच्या बळजबरीने केल्या जाणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (नसबंदी)मुळे काँग्रेसविरुद्ध कमालीची नाराजी मतदारांत पसरली होती. त्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी वातावरण पार बदलून गेले. बापू काळदाते पट्टीचे वक्ते. त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. औरंगाबादची मतदार संख्या ६ लाख ५६ हजार ९९६ वर पोहोचली होती. १६ मार्च १९७७ रोजी मतदान झाले. ३ लाख ६९ हजार ३० अर्थात ५६.१७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद मतदारसंघात आतापर्यंत एवढे मतदान झाले नव्हते. 

राजूरकर पराभूत
बापू काळदाते, चंद्रशेखर राजूरकर, कासीम किस्मतवाला आणि सय्यद अहमद रजा रजवी हे ४ उमेदवार रिंगणात होते. एकूण ७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती; परंतु तिघांनी अर्ज परत घेतले. बापू काळदाते यांना २ लाख १ हजार २१ (५६.४७ टक्के), राजूरकर यांना १ लाख ४३ हजार ९३२ (४०.४३ टक्के) कासीम किस्मतवाला ६ हजार ८५२ (१.९२ टक्के) आणि सय्यद अहमद रजा रजवी यांना ४ हजार १९८ (१.१८ टक्के) मते मिळाली. काळदाते यांनी ५७ हजार ८९ मतांनी राजूरकर यांचा पराभव केला. कासीम किस्मतवाला व सय्यद अहमद यांचे डिपॉझिट जप्त झाले. 

देशात पहिले गैरकाँग्रेसी सरकार
महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाढून या वेळेस ४८ झाल्या होत्या. त्यापैकी २० जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले, तर बीएलडीचे १९, सीपीएम ३, पीडब्ल्यूपी ५, रिपब्लिकन पार्टी (खो)-१ उमेदवार विजयी झाला. देशपातळीवर बीएलडीने २९८ जागा मिळवून २५ मार्च १९७७ रोजी पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन केले. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. 

बापू काळदाते यांचा अल्प परिचय
डॉ. बापूसाहेब काळदाते ऊर्फ विठ्ठल रामचंद्र काळदाते यांचा जन्म १ डिसेंबर १९२७ रोजी बीड जिल्ह्यातील इस्थळ या गावी झाला. पंढरपूर हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या टी.आर. आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. राष्ट्र सेवा दलातून आलेले, समाजवादी विचारवंत असलेले बापू सडेतोड वक्ते होते. १९६७ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश करताना त्यांनी सहकारमहर्षी केशव सोनवणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना ‘जायंट किलर’ अशी ओळख मिळाली होती. १९७७ मध्ये औरंगाबादेतून खासदार व नंतर दोनदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर ते खासदार म्हणून गेले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासह अनेक आंदोलनात ते सहभागी झाले. त्यांना सहा वेळेस तुरुंगवासही भोगावा लागला. आणीबाणीत त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. जनता दलाचे सरचिटणीस व उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची आॅफर केवळ तत्त्वनिष्ठा म्हणून त्यांनी अव्हेरली होती. 

Web Title: Flashback: voters give Congress a big blow due to Emergency in Aurangabad lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.