मराठवाड्यात निवडणुकीचा खर्च ९५ कोटींहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 05:43 PM2019-04-21T17:43:01+5:302019-04-21T17:49:17+5:30

एका मतदान केंद्रावर ५९ हजार खर्च 

The cost of election in Marathwada is more than 95 crores | मराठवाड्यात निवडणुकीचा खर्च ९५ कोटींहून अधिक

मराठवाड्यात निवडणुकीचा खर्च ९५ कोटींहून अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचारी, प्रवास, भोजन, मतदारांसाठी पाणी आदी सुविधा मराठवाड्यात १६ हजार २१३ मतदान केंद्र

- विकास राऊत  

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या व्यवस्थापनावर मराठवाड्यातील १६ हजार २१३ मतदान केंद्रांसह यंत्रणा व्यवस्थापनासाठी अंदाजे ९५ कोटी रुपयांहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर हा खर्च आयोगाच्या तरतुदीप्रमाणे वितरित केला जातो. हा लवचिक असून, त्यात कमी-अधिक प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत मतदान झाले आहे. औरंगाबाद व जालना मतदारसंघांत २३ रोजी मतदान आहे. विभागीय प्रशासन मराठवाड्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खर्चाची माहिती संकलित करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निवडणूक कामकाजात असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी बसेस व इतर वाहनांची गरज लागते आहे. कर्मचाऱ्यांचे भोजन, प्रवास, मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी पाणीपुरवठा करणे, आवश्यक तिथे शेडस् उभारणे, भरारी पथकांना लागणारे इंधन, इमर्जन्सीमध्ये वीजपुरवठ्यासाठी जनरेटर, खुर्च्या, स्टेशनरी आदी खर्चाचा यामध्ये समावेश असतो. ९५ कोटी रुपयांचा संभाव्य खर्च सूत्रांनी सांगितला असला तरी हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाहन व्यवस्थेसाठी जास्तीची गरज पडली, तर तो खर्चदेखील यंत्रणेला करावा लागतो. विभागात काही मतदान केंद्रे मुख्यालयापासून १०० कि़मी.पेक्षा लांब अंतरावर आहेत. अशा केंद्रांसाठी जास्त खर्च होतो, तसेच सुरक्षेसाठी पोलिसांची कुमकदेखील असते. मतदान मोजणीच्या दिवशीचा खर्च वेगळा असतो. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गरजेनुसार निवडणूक व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या असून, निवडणुकीनंतर आयोगाकडून सदरील खर्चाची पूर्तता केली जाते. 

उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी... 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २,०२१, तर जालना लोकसभा मतदारसंघात १,०४६ मिळून ३,०६७ मतदान केंद्रे आहेत. औरंगाबादेत १,९३६ मुख्य केंद्रे आणि ८२ साह्यकारी केंद्रे त्यामध्ये आहेत. १८ लाख ८६ हजार २९४  मतदार संख्या आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ३५० मतदान केंद्रे असून, सर्वात कमी ३१७ केंद्रे औरंगाबाद पूर्वमध्ये आहेत. मतदान केंद्रावर किती रुपये खर्च होणार याचा अंतिम आकडा अजून काढलेला नाही; परंतु सध्या जिल्ह्यातील ३ हजार ६७ मतदान केंद्रांसाठी १८ कोटींच्या आसपास रक्कम लागेल, असा अंदाज आहे. यावरून केंद्रनिहाय खर्चाचे अनुमान लावता येईल.५८ हजार ६८९ रुपये एका मतदान केंद्रासाठी खर्च होण्याचे हे प्रमाण आहे. हा लवचिक खर्च असतो, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक नीलेश श्रींगी यांनी सांगितले.  

मराठवाड्यातील केंद्र
जिल्हा    मतदान केंदे्र
औरंगाबाद    ३,०६७
जालना    १,६७८
परभणी    १,५४२
बीड    २,३३३
लातूर    २,०६१
हिंगोली    १,०६०
नांदेड    २,९७५
उस्मानाबाद    १,४९७
एकूण    १६,२१३

Web Title: The cost of election in Marathwada is more than 95 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.