लोकसभेसाठी आयएएस भापकर, केंद्रेकर यांच्यानंतर मधुकर राजेआर्दड यांच्याही नावाची चर्चा

By विकास राऊत | Published: April 1, 2024 02:51 PM2024-04-01T14:51:32+5:302024-04-01T14:54:35+5:30

विद्यमान विभाग आयुक्त असलेले राजेआर्दड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, त्यांचे नाव परभणी लोकसभा मतदारसंघानंतर आता छत्रपती संभाजीनगरसाठी (औरंगाबाद) चर्चेत आले आहे.

After IAS Purushottam Bhapkar, Sunil Kendrakar, Madhukar Rajeardad's name is also discussed for Lok Sabha | लोकसभेसाठी आयएएस भापकर, केंद्रेकर यांच्यानंतर मधुकर राजेआर्दड यांच्याही नावाची चर्चा

लोकसभेसाठी आयएएस भापकर, केंद्रेकर यांच्यानंतर मधुकर राजेआर्दड यांच्याही नावाची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागीय आयुक्तालयात आयुक्तपदावर अलीकडच्या पाच ते सहा वर्षांतील तीन सनदी अधिकाऱ्यांची नावे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी चर्चेत आली. यामध्ये माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सुनील केंद्रेकर आणि विद्यमान आयुक्त मधुकर राजेआर्दड या नावांचा समावेश आहे. राजेआर्दड यांचे नाव परभणी मतदारसंघासाठी चर्चेत होते. आता औरंगाबाद लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ मध्ये माजी आयुक्त डॉ. भापकर यांचे नाव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार म्हणून चर्चेत आले. यावरून राजकीय नेते विरुद्ध भापकर असे राजकारण रंगले. यातूनच भापकर यांची सेवानिवृत्तीला आठ दिवस राहिलेले असताना बदली करण्यात आली. निवडणुका लागल्यानंतर भापकर यांचे नाव मागे पडले. पुढे ते शेती व साहित्यात रमले.

भापकर यांच्यानंतर विभागीय आयुक्तपदाची धुरा सुनील केंद्रेकर यांच्यावर आली. २०१९ ते २०२३ या चार वर्षांच्या कालखंडात त्यांनी मराठवाडा विभागात काम केले. मे २०२३ मध्ये केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांची मीमांसा करताना एक पाहणी अहवाल तयार केला. या अहवालामुळे सत्ताधारी आणि केंद्रेकर यांच्यातील वाद विकोपाला गेले. प्रशासन आणि राजकारण या दोन गोष्टी एकत्रित होऊन केंद्रेकर यांनी अखेरीस स्वेच्छानिवृत्तीचे पत्र शासनाला पाठविले. जुलै २०२३ मध्ये केंद्रेकर यांचा राजीनामा प्रशासनाने मंजूर केला. सेवानिवृत्तीनंतर केंद्रेकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली. परंतु, स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रेकरही शेतीमध्ये रमले. त्यामुळे ते निवडणूक लढविणार ही चर्चाच ठरली.

परभणीसाठी माझे नाव चर्चेत होते
विद्यमान विभाग आयुक्त असलेले राजेआर्दड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, त्यांचे नाव परभणी लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आले होते. परभणी कृषी विद्यापीठ, परतूर, मंठा, जालना जिल्ह्यात त्यांचे बालपण, शिक्षण झाले आहे. नातेवाइकांचे नेटवर्क याच भागात असल्यामुळे राजेआर्दड यांचे नाव परभणी मतदारसंघासाठी चर्चेत होते. तसेच मराठा आरक्षण दस्तावेज संशोधनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक वाढल्यामुळे त्यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत होते. मात्र, जागा वाटाघाटीत महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. आता पुन्हा शिंदेसेनेकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी त्यांचे समर्थक मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग करीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राजेआर्दड यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्यासाठी कोण प्रयत्न करीत आहे, हे माहिती नाही; परंतु परभणी मतदारसंघासाठी माझे नाव चर्चेत होते, हे मात्र खरे आहे.

Web Title: After IAS Purushottam Bhapkar, Sunil Kendrakar, Madhukar Rajeardad's name is also discussed for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.