Miss World Manishali does not want to be an actress, wish to do this work! | मिस वर्ल्ड मानुषीला अभिनेत्री नाही बनायचं, तर हे काम करायची आहे इच्छा!

हरियाणाच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला. हा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय ठरली आहे. 20 वर्षीय मानुषी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. हा किताब जिंकल्यानंतर ती बरीच एक्साईटेड आहे. तिला तिचं शिक्षण पूर्ण करुन एक दिवस हृदयाची डॉक्टर बनायचं आहे. तिची स्वप्न, ध्येय याचविषयी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्यासाशी साधलेला हा दिलखुलास संवाद.

 

मिस वर्ल्ड बनून घरी परतल्यानंतर काय भावना आहेत? 

माझ्या मते जे काही घडलं ते सारं स्वप्नवत भासत आहे. मध्यरात्री माझं विमान उतरलं आणि त्यानंतर जे काही मी पाहिले ते सारं भारावून टाकणारं होतं. माझ्या स्वागतासाठी कित्येक लोक इतक्या रात्रीसुद्धा आवर्जून हजर होते. प्रत्येकाच्या तोंडून फक्त इंडिया इंडिया हे शब्दच कानावर पडत होते. ते सारं वातावरण भारावून टाकणारं होतं. तुमची ओळख जेव्हा देशाची प्रतिनिधी म्हणून होत असते तो क्षण म्हणजे अभिमानाचा असतो. मला खरंच कल्पना नव्हती कीइतकं मोठं काही मी करुन दाखवलं आहे. अजूनही तो क्षण मी जगत आहे.

 

तू मेडिकलचा अभ्यास करतेस त्यात आता मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहेस. तर आता तू या सगळ्या गोष्टींचा मेळ कसा घालणार आहेस?

 

पहिल्यांदाच मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आहे.त्यामुळे ती भावना काय असते ते पहिल्यांदा अनुभवत आहे. तुम्हाला जे आवडते ते करावं असं मी मानते. मला माझं शिक्षणही तितकंच प्रिय आहे. आगामी तीन वर्षांत मी डॉक्टर ही पदवी मिळवेन. मिस इंडियाकिताब जिंकल्यानंतर माझ्यावरील जबाबदा-या आणखी वाढल्या होत्या. त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचं मी ठरवलं होतं. माझ्याप्रमाणेच आधी ब-याच मिस इंडिया होत्या ज्यांनी आपलं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मात्र वैद्यकीय शिक्षणातून तुम्हाला जीवनात ब-याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यामुळेच मला माझं वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडायचं नाही. मी काही काळ ब्रेक घेऊन माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे. 

 

वैद्यकीय शिक्षण घेणारी तू विद्यार्थिनी मग सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सहभागी व्हावं हा विचार कसा आला? 

माझी आई ऐश्वर्या रायची मोठी चाहती होती. त्यातच मला स्टेजवर परफॉर्म करणं आवडायचं आणि विविध कार्यक्रमांत सहभागी होत असे. त्यावेळी आई नेहमी ऐश्वर्याला पाहून बोलायची की एक दिवस तूसुद्धा तिथे असशील. त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं की मिस वर्ल्ड काय असते, त्याचे महत्त्व काय ते मला त्यावेळी उमगलं. ही फक्त एक सौंदर्यवतींची स्पर्धा नसून त्यात ब-याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. या स्पर्धेच्या आजवरील विजेत्या पाहिल्या तरतुम्हाला लक्षात येईल की प्रत्येकीमध्ये काही ना काही खास वैशिष्ट्य होतं. विशे म्हणजे त्या सगळ्या महिला म्हणून सक्षम होत्या. मिस वर्ल्ड हे एक उत्तम व्यासपीठ असून ज्याद्वारे तुम्ही समाजासाठी योगदान देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला ब-याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात, नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळते असं नाही तर या प्रवासादरम्यान प्रत्येक अनुभव तुम्हाला व्यक्ती म्हणून समृद्ध करणारा असतो. 

जगभरातील सौंदर्यवतीना भेटण्याचा आणि त्यांच्यासह वावरण्याची संधी तुला या निमित्ताने लाभली. यातून तुला काय काय नवीन शिकायला मिळालं?

केवळ आपापल्या देशाची भाषा शिकण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही तर प्रत्येकीने इतर देशातील स्थानिक भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ब-याच गोष्टी नव्याने शिकण्यासारख्या होत्या. चायनीज चॉप्स स्टीकचा वापर कसा करावा हेही मी याच काळात शिकले. तिथे आलेली प्रत्येक स्पर्धक वेगळी होती. त्यात मिस सेनेगल तर सगळ्यात वेगळी होती. तिला तिची स्थानिक भाषा आणि फ्रेंच वगळता दुसरी कोणतीच भाषा येत नव्हती. त्यामुळे तिच्याशी संवाद साधताना ब-याच जणींना अडचणी येत होत्या. मात्र भाषेऐवजी इतर गोष्टीही आहेत ज्याद्वारे तुम्ही एकमेकांशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही वेगळ्या वातावरणात, वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढता, मात्र तुमचं ध्येय अन् उद्देश एक असतो ज्यामुळे तुम्ही जवळ येऊ शकता, कनेक्ट होऊ शकता. अगदी तेच माझ्याबाबतीत आणि मिस सेनेगलबाबत झालं. आम्ही दोघी एकमेकींशी संवाद साधू शकलो आणि चांगल्या मैत्रिणी बनलो. याशिवाय माझ्या इतर देशाच्याही ब-याच मैत्रिणी बनल्या.

 

सौदर्यंवतीचा किताब जिंकल्यानंतरचा पहिला अनुभव कसा होता ?

माझ्यासाठी तो एक साहसी क्षण होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण ना मी व्यवस्थित मेकअप केला होता ना हेअर व्यवस्थित केले होतं. फक्त ड्रेस आणि हिल परिधान केले होते. मिस इंडिया बनल्याची भावना माझ्यासाठी अदभुत होती. दिल्ली एम्सच्या कॉलेज फेस्टला मी उपस्थित होते तेव्हा माझ्या नावाने जयघोष सुरु होता. माझे आईवडिलही चंदीगढवरुन आले होते. मी मिस इंडिया किताब जिंकला यावर माझा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. हळूहळू इतरांना पाहून मी ब-याच गोष्टी शिकले. मिस वर्ल्डच्या वेळी मला विशेष प्रशिक्षण मिळालं. हा माझा आजवरचा प्रवास होता. गेल्या वर्षभरात मी अनेक नवीन गोष्टी शिकले आहे. कधीकधी मीच विचार करते की वर्षभरापूर्वी मी काय होते आणि आज काय आहे.

 

यश, प्रसिद्धी आणि पैसा या सगळ्या गोष्टींकडे आता तू कशारितीने पाहतेस ?

डॉक्टर बराच पैसा कमावतात. त्यामुळे मला माहित होतं की जीवनात कधी ना कधी माझ्याकडे पैसा हा येणारच. तुम्ही कधीकधी विचार करत नाही तेच आयुष्यात घडतं. आणि तेच खरं जीवन असतं असं मला वाटतं. सध्याचा माझा प्रवास पाहता मला काहीच कल्पना नव्हती की वर्षभरानंतर मी कुठे असेन. सारं काही मी नशिबावर सोडून दिलं होतं. मला कल्पना आहे की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मिस वर्ल्ड बनल्यानंतर सगळीकडे फिरण्यात माझा वेळ जाणार आहे. मात्र तो वेळ सत्कार्मी लावायचा आहे. समाजासाठी जेवढं योगदान देता येईल तेवढं करायचं आहे. मला माहित आहे की माझ्याकडे वेळ आला की संधी आपोआप येतील आणि त्यानुसार माझा निर्णय मी घेईल.

 

तू विना नफा तत्त्वावरील संस्था स्थापण्याचा विचार करत आहेस असंही आम्ही ऐकलं आहे त्याबाबतीत काय सांगशील ?

माझं कॉलेज हरियाणणाच्या ग्रामीण भागात आहे आणि तिथल्या लोकांना आरोग्य केंद्रांमधून मूलभूत आरोग्य सोयीसुविधा मिळवण्यासाठी चार ते पाच तासांचा प्रवास करावा लागतो. कारण स्थानिक ठिकाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सध्या हृदय आणि रक्तवाहिनी संदर्भातील आजारांमुळे दगावणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. मला हृदयाची डॉक्टर व्हायचं आहे. मिस इंडिया बनल्यानंतर मला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. त्या लोकप्रियतेचा वापर करुन मी माझ्या लोकांसाठी आणि समाजासाठी करु शकले तर ते माझं भाग्य मानते. माझ्या ज्ञानाचा आणि लोकप्रियतेचा फायदा घेऊन मी काही तरी करु शकते असं मला वाटते. यामुळे लोकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.

हरियाणाच्या लेकी सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर आहेत, कसं वाटतं ?

मला आनंद आहे की लोकांचा दृष्टीकोन आता बदलू लागला आहे. ब-याच यशस्वी महिला या हरियाणाच्या लेकी आहेत याचा खरंच आनंद आहे. यानिमित्ताने मला सगळ्या तरुणींना सांगायचं आहे की तुम्ही जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न बघा आणि यश आपसुकच तुमच्या मागे मागे येईल. प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा तोच अनुभव आहे. तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक रहा आणि मग पाहा तुम्हाला तुमचं यश मिळवण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही.

प्रत्येक मिस वर्ल्डचा पुढचं डेस्टिनेशन हे बॉलीवुड असतं मग तुझ्याबाबतीतही तसंच आहे का ?

भारताच्या पाच मिस वर्ल्डपैकी फक्त दोघी बॉलीवुडमध्ये आहेत आणि इतर तिघी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पहिली आशियाई महिला जिने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला ती आयर्लंडमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. त्यामुळे मला वाटत नाही की मिस वर्ल्ड म्हणजे तिकीट टू बॉलीवुड असं काही आहे. मात्र एक खरं आहे की ज्या बॉलीवुडमध्ये आहेत त्या खरंच खूप मेहनती आहेत आणि त्यामुळेच त्या बॉलीवुडमध्ये नाव कमावत आहेत.   

एनएसडीमधून तू अभिनयाचे धडे घेतले आहेस असं आम्ही ऐकलंय?

मला नवनवीन गोष्टी करायला आवडतात. स्टेजवर परफॉर्म करणंही मला भावतं आणि ब-याचदा परफॉर्मही केलं आहे. एनएसडीममध्ये मी दोन वर्षे अभिनयाचे धडे घेतले आहेत. मला डान्स आणि चित्रकलेची आवड आहे त्यामुळेच मी एनएसडीममध्ये धडे घेतले. 

अभिनयात तुला करिअर करायला आवडेल?

कोणतीही नवी गोष्ट करण्याची एक वेगळीच मजा असते. थिएटर हे एक वेगळं माध्यम आहे. एनएसडीमुळे तुम्हाला विविध गोष्टी आत्मसात करता येतात. याच माध्यमातून एखादी व्यक्तीरेखा अधिक सक्षमपणे मांडता येणं शक्य होतं. बॉलीवुडमध्ये काम करायला मी तयार आहे मात्र माझ्या मूळ कामावरुन आणि ध्येयावरुन मला लक्षहटवायचं नाही. मला जे करण्याची उत्कट इच्छा आहे, जे मी करत आहे ते सातत्याने करायचे आहे. नवनवीन संधी आपोआप येत राहतील. 

 

पुढल्या वर्षासाठी तुझ्या काय योजना आहेत?

पुढलं एक वर्ष माझा प्रवास आणि फिरण्यातच जाणार आहे. त्यानंतरचे दोन वर्षे मी अभ्यासासाठी धडपडणारी विद्यार्थिनी असेन. माझ्या कॉलेजमधील सिनीयर्सनी वारंवार मला बजावल्याप्रमाणे पुढील पाच वर्षे अभ्यासातच जातील कारण वैद्यकीय शिक्षण हे बरंच मोठं असतं

 

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा तुझ्यावरुन वाद सुरु आहे, काय वाटतं तुला?

 माझ्या राज्यासाठी काम करण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी माझा विचार केला ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे. बेटी पढाओ, बेटी बचाओ असो किंवा मासिक पाळीच्या वेळी महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत जनजागृती करणा-या कोणत्याही उपक्रमाशी जोडले जाऊन काम करणं मला आवडेल. सरकारच्या उपक्रमातूनअधिकाधिक लोकांपर्यंत मला पोहचता येईल. सरकार आणि जनता यांच्यातील दुवा बनून काम करायला नक्की आवडेल.

मासिक पाळी स्वच्छते संदर्भात जनजागृती करत आहेस त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?

मला माझ्या घरात काम करणा-या महिलेकडून याबाबत सगळ्यात आधी समजलं. मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत ब-याच महिलांना अनेक गोष्टी माहित नाहीत. कारण त्याचं महत्त्व काय याबाबत तेवढी जागरुकता पसरवण्यात आलेली नाही. उलट याबाबत अनेक गैरसमज समाजात असून त्याबद्दल कुणालाही बोलायचं नाही. जेव्हा मी कॉलेजला जाऊ लागले तेव्हा महिला कळलं की सॅनिटरी पॅड्स उपलब्ध नसणे आणि हॉस्पिटल्सकडून त्याचा पुरवठा न होणे हेही त्यामागचं कारण असल्याचं मला समजलं. सॅनिटरी पॅड्स महाग असल्याने त्या खरेदी करण्यात त्यांना विशेष रस नसतो. त्यामुळेच मी माझ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून याबाबतचे गैरसमज दूर करुन जनजागृती करायचे ठरवलं आहे. त्यासाठी सॅनिटरी पॅड बनवणारी परी या स्थानिक उत्पादकांना मी सोबत घेतलं. त्याच्या मदतीने मी बराच अभ्यास केला आणि दिल्लीतील अनेक वॉलमार्ट स्टोरमध्ये फिरले. वॉलमार्ट स्टोरवाल्यांशी आम्ही बोललो आणि त्यांना सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करुन देण्याबाबत समजावलं. तसंच महिलांनी ते खरेदी करावं यासाठी त्याची किंमत कमी ठेवावी अशी विनंतीही त्यांना केली. जेणेकरुन महिला खरेदी करतील आणि शिवाय आपल्या गावापर्यंतही त्या सॅनिटरी पॅड्स घेऊन जातील.

जीएसटीबाबत तुझं मत काय आहे? 

सॅनिटरी पॅड्सवर कर लावण्यात आला आहे आणि त्यामुळे त्या महाग आहेत. माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे की सॅनिटरी पॅड्स करमुक्त असलेच पाहिजे. जीएसटीबद्दल बोलायं तर हा एक चांगला निर्णय आहे कारण यामुळे अनेक करांचा फटका बसत नाही.

तुझ्या पुढील योजना काय असतील?  तुला इतर ठिकाणीही काम करायला आवडेल?

मिस वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करायला आवडेल. द ब्युटी विद पर्पज हा किताब मी जिंकला आहे त्यामुळे मासिक पाळी स्वच्छतेसंदर्भात संदर्भात मला काम पुढे न्यायचं आहे.. लवकरच संस्थेचे सदस्य माझं काम पाहण्यासाठी येतील. माझ्याउपक्रमाच्या कक्षा वाढवण्याचा माझा प्रयत्न असेन. कारण नेपाळ,झिम्बाब्वेमधील नागरिकांच्याही समस्या सारख्याच आहेत.

 

शशी थरुर यांनी तुझ्या आडनावावरुन खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता?

मला त्याबद्दल काहीही माहित नव्हतं कारण त्यावेळी मी चीनमध्ये होते. मात्र हाँगकाँगमध्ये उतरताच मला याबाबत कळलं. मला या सगळ्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते मी बोलले आहे. आता तो जुना विषय झाला आहे.

 

 
Web Title: Miss World Manishali does not want to be an actress, wish to do this work!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.