बीडमध्ये महिला सांभाळणार ३ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:20 AM2019-04-16T00:20:32+5:302019-04-16T00:25:32+5:30

१८ एप्रिल रोजी बीड लोकसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीत तीन मतदान केंद्र महिला सांभाळणार आहेत. ही केंद्रे सखी केंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत.

3 polling stations will be held in Beed | बीडमध्ये महिला सांभाळणार ३ मतदान केंद्रे

बीडमध्ये महिला सांभाळणार ३ मतदान केंद्रे

Next
ठळक मुद्देप्रशासन सज्ज : दिव्यांग बांधव देखील संभाळणार एक मतदान केंद्र; मतदानासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण

बीड : १८ एप्रिल रोजी बीड लोकसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीत तीन मतदान केंद्र महिला सांभाळणार आहेत. ही केंद्रे सखी केंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत. तसेच १ केंद्र दिव्यांग बांधव सांभाळणार आहेत. अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
बीड जिल्ह्यात २३२५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये सर्व प्रक्रिया योग्यरित्या पार पडावी यासाठी जवळपास १८ हजार अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजात सहभागी झाले आहेत. सर्व मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून, मतदारांसाठी लागणारी सर्व सोयीसुविधांची व्यवस्था पूर्ण झाली आहे.
गतवेळी जवळपास ६६ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यापेक्षा अधिक होण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने २ कोटी ७९ लाख रुपये जप्त करण्यात आले असून, सभा व रॅलीच्या संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचसोबत सी-व्हिजील अ‍ॅपवर आलेल्या २२ तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया निवडणूक विभागामर्फत सुरु आहे. एक खिडकी सुविधा केंद्रामुळे उमेदवारांना परवानगी तात्काळ देण्यात आली.
१८ तारखेला मतदान प्रक्रिया सुरक्षित, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
१५ मिनिटांत बदलली जाणार ईव्हीएम
मतदान प्रक्रियेसाठी यावर्षी एम३ ही हायटेक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. तरी देखील मतदान प्रक्रिया सुरु असताना यंत्रात काही बिघाड झाला तर ते १५ मिनिटांत बदलून देण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारे कर्मचारी प्रत्येक मतदान कक्षाच्या ठिकाणी असणार आहेत. त्याचसोबत प्रत्येक ठिकाणी राखीव मतदान यंत्रे देखील ठेवणार आहेत.
मतदारांच्या सुविधेसाठी उपाययोजना
उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी सावली नाही तिथे सावलीसाठी शेड उभारण्यात आले आहे. तसेच मतदारांच्या सुविधेसाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत.
दिव्यांग मतदारांच्या जनजागृतीसाठी राजेंद्र लाड हे निवडणूक आयोगाचे जिल्ह्यातील राजदूत
बीड : बीड लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यातील आष्टी येथील राजेंद्र शाहूराव लाड यांना निवडणूक आयोगाचे जिल्ह्यातील राजदूत (‘ डिस्ट्रिक्ट आयकॉन /अँबॅसेडर’) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाही बळकट करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा याकामी जिल्हास्तरावर दिव्यांग मतदारांच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राजेंद्र लाड यांची ही नियुक्ती केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य स्वीकारलेले आहे. दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रिया व निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपले मतदान नोंदवावे, असा यामागे उद्देश आहे.

Web Title: 3 polling stations will be held in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.