Lok Sabha Election 2019; पारा ४१, मतदान ६१%

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:49 AM2019-04-19T00:49:46+5:302019-04-19T00:51:25+5:30

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने दिलासा दिला. उन्हाचा पारा गुरुवारी ४१ पार झाल्याने दुपारी मतदानात शिथिलता आली. मात्र, सकाळी व दुपारी ही तूट भरून निघाली. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

Lok Sabha Election 2019; Mercury 41, voting 61% | Lok Sabha Election 2019; पारा ४१, मतदान ६१%

Lok Sabha Election 2019; पारा ४१, मतदान ६१%

Next
ठळक मुद्देअवकाळीपासून दिलासा, लग्नसराईचा फटका : सकाळी अधिक, दुपारनंतरही वाढला टक्का

अमरावती : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने दिलासा दिला. उन्हाचा पारा गुरुवारी ४१ पार झाल्याने दुपारी मतदानात शिथिलता आली. मात्र, सकाळी व दुपारी ही तूट भरून निघाली. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. मेळघाटातून आकडेवारी मिळायला उशीर झाल्याने टक्केवारीत काहीशी तफावत असू शकेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी अंतिम दिवशी ही लढत महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ या गतवेळच्या प्रतिस्पर्ध्यांमध्येच झाली. रिंगणात २४ उमेदवारांसह ‘नोटा’ असल्याने यंदा दोन इव्हीएमचा वापर करावा लागला.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्याचे ४५ मिनिटांपूर्वी मॉक पोल घेण्यात आला. याला बहुतांश उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. मात्र, किमान ४० ते ५० मशीन मतदान प्रक्रियेत बंद पडल्या. त्यामुळे झोनल अधिकाऱ्यांनी येऊन तातडीने राखीव व्हीव्हीपॅट लावल्या. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्यादेखील तक्रारी आहेत. नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतदेखील मतदार यादीत नाव नसणे, प्रभाग बदलणे आदी प्रकार झाल्याने निवडणूक यंत्रणेची पोलखोल झाली.
निवडणुकीत एकूण १८ लाख ३० हजार ५६१ मतदार आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच सकाळी ७ ते ९ दरम्यान मतदारांचा उत्साह नव्हता. या वेळात १ लाख २५ हजार ४८१ मतदान झाले. यात ८६ हजार ९९ पुरुष व ३९ हजार ३८१ स्त्री मतदारांनी सहभाग नोंदविला. ही टक्केवारी ६.८५ आहे. त्यानंतर सकाळी ११ पर्यंत २ लाख १९ हजार ५६४ पुरुष व १ लाख ३७ हजार १६७ स्त्री अशा एकूण ३ लाख ५६ हजार ७३३ मतदारांनी सहभाग नोंदविला. ही टक्केवारी १९.४९ आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३ लाख ४९ हजार ८५० पुरुष व २ लाख ६७ हजार ५४८ स्त्री मतदारांचे मतदान झाले. ही टक्केवारी ३३.७३ आहे. दुपारी १ ते ३ या कालावधीत थोडी शिथिलता आली. यावेळी ४ लाख ५४ हजार ८९३ पुरुष व ३ लाख ७७ हजार ४७१ स्त्री अशा एकूण ८ लाख ३२ हजार ३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क नोंदविला. ही ४५. ४७ टक्केवारी आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ लाख ४७ हजार ४५६ पुरुष व ४ लाख ६४ हजार ३८१ स्त्री अशा एकूण १० लाख ११ हजार ८४० मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५५.२७ आहे. मात्र, ५ नंतर काही केंद्रांवर गर्दी वाढल्याने वेळेच्या आत मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

मतदानानंतर बॅलेट युनिटचे छायाचित्र फेसबूकवर
मतदान करताना बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी मतदानादरम्यान अमरावती शहरात घडला. बहुतांश मतदान केंद्रांवर सर्रास मोबाइलचा वापर झाल्याचे आढळून आले. त्याचा दुरुपयोगही काही जणांनी केला. मतदान करतेवेळी बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटचे छायाचित्र काही मतदात्यांनी काढल्याचे या व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून निदर्शनास येत आहे. एका फेसबूक खात्यावर बॅलेट युनिटचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले. यात आनंदराव अडसुळ यांच्या ‘धनुष्यबाणा’ला मतदान केल्याचे दिसून येत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर व्हीव्हीपॅटचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ‘पाना’ हे चिन्ह असल्याचे चिठ्ठीत दिसून येत आहे. त्याची पडताळणी व चौकशी करण्याचे आश्वासन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील म्हणाले.

नवनीत राणा यांच्या चिन्हासमोर ‘कॅन्सल्ड’
मतदान केंद्राबाहेरील नोटीस बोर्डवर लावलेल्या डमी बॅलेटवर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक चिन्हासमोर ‘कॅन्सल्ड’ नमूद केल्याचे आढळून आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाºयाच्या कृतीने काही मतांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार युवा स्वाभिमान पार्टीचे उमेश ढोणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदात्यांना उमेदवारांची नावे व चिन्हांची माहिती व्हावी, यासाठी सर्व मतदान केंद्रांबाहेर असलेल्या नोटीस बोर्डावर बनावट (डमी) बॅलेट लावण्यात आले. मात्र, शहरातील काही मतदान केंद्रांवर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या नावासमोर व चिन्हासमोर ‘कॅन्सल्ड’ नमूद केल्याचे आढळले. मतदारांनीही याबाबत चीड व्यक्त केली. दरम्यान, ती डमी असल्याने ‘कॅन्सल्ड’ नमूद करून फुली मारली जाते. एआरओ ही कार्यवाही करतात. ती येऊ शकतो, अशी माहिती शरद पाटील यांनी दिली.

आनंदराव अडसुळांविरुद्ध आचासंहिता भंगचा गुन्हा
भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा बुधवारी रात्री नोंदविण्यात आला. युतीच्या राजकमल चौकातील प्रचार कार्यालयावरील होर्डिंग काढले नसल्याची तक्रार भरारी पथकाचे नितीन बाबाराव उंडे यांनी कोतवाली पोलिसांत नोंदविली होती. भरारी पथक बुधवारी सायंकाळी राजकमल चौकातून जात असताना, त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार कार्यालयावर होर्डिंग दृष्टीस पडले. हे आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Mercury 41, voting 61%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.