Lok Sabha Election 2019 : थंड प्रचार; बाजारात ‘इलेक्शन तेजी’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:08 PM2019-04-10T12:08:41+5:302019-04-10T12:19:31+5:30

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता अवघे आठ दिवस बाकी आहेत. पुढचे सहा दिवस हे प्रचाराचे दिवस आहेत; मात्र अजूनही अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी दिसत नाही.

 Lok Sabha Election 2019: Cool Promotions; There is no election mood in the market! | Lok Sabha Election 2019 : थंड प्रचार; बाजारात ‘इलेक्शन तेजी’ नाही!

Lok Sabha Election 2019 : थंड प्रचार; बाजारात ‘इलेक्शन तेजी’ नाही!

Next
ठळक मुद्दे निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधनांच्या खरेदीमध्ये तब्बल ७० टक्के घट झाल्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त रोजगार मिळालाच नाही.निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या परवानगीनुसार केवळ ११२ वाहनांमधून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.संपूर्ण मतदारसंघात निवडणूक विभागाकडून अवघ्या ११३ होर्डिंगसाठी परवानगी घेण्यात आली आहे.

- राजेश शेगोकार
अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता अवघे आठ दिवस बाकी आहेत. पुढचे सहा दिवस हे प्रचाराचे दिवस आहेत; मात्र अजूनही अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी दिसत नाही. २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी विविध साधनांचा वापर करून प्रचाराची राळ उडविली होती. ती साधने यावेळी दिसतच नसल्याने बाजारातील ‘इलेक्शन तेजी’ संपल्याचे चित्र आहे.
कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली की त्याच दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असे. त्यासाठी सर्वात आधी खासगी वाहनांची बुकिंग केली जाई व गावा-गावांतून गाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून प्रचार करण्यापासून तर गल्लोगल्ली मोठमोठे फलक लावण्याचे काम सर्वात आधी केले जाई. त्यानंतर प्रचार दौरे, पदयात्रा, झालाच तर रोड शो, मोठ्या नेत्यांच्या सभा व नियोजन असा निवडणुकीचा माहोल आणखी रंगतदार करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गळ्यात दुपट्टे, टोप्या, पक्षाचे बिल्ले व त्यांच्या गाड्यांवर झेंडे अशा साधनांची आवश्यकता भासत असे. ही सर्व साधने स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करण्यावर उमेदवारांचा भर राहत असल्याने स्थानिक बाजारात अनेकांना रोजगार उपलब्ध होत असे. निवडणुकीच्या निमित्ताने बाजारात एकप्रकारे ‘इलेक्शन तेजी’ येत असे. यावेळी मात्र अशा प्रकारची कोणतीही तेजी नाही. निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधनांच्या खरेदीमध्ये तब्बल ७० टक्के घट झाल्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त रोजगार मिळालाच नाही.
 
११२ वाहनांवर सुरू आहे प्रचार
प्रचारासाठी गावोगावी फिरणाऱ्या वाहनांची संख्या एकदमच रोडावली आहे. तब्बल ११ उमेदवार रिंगणात असतानाही निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या परवानगीनुसार केवळ ११२ वाहनांमधून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या समर्थकांच्या गाड्यांचाही धुराळा ग्रामीण भागासह शहरातही दिसत नाही.

 ११३ होर्डिंग; प्रमुख चौकातच!

उमेदवारांनी आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी होर्डिंगवरचा खर्चही कमी केल्याचे दिसत आहे. संपूर्ण मतदारसंघात निवडणूक विभागाकडून अवघ्या ११३ होर्डिंगसाठी परवानगी घेण्यात आली आहे.
 
प्रचार रथ व चालक मध्य प्रदेशातील
एका राजकीय पक्षाचा प्रचार रथ सध्या अकोल्यात फिरत आहे. एका ट्रकवर हा रथ तयार करण्यात आला असून, सदर ट्रक मध्य प्रदेशचा आहे. विशेष म्हणजे, या ट्रकवरील चालक आणि क्लीनरही मध्य प्रदेशातीलच असल्याने निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिकांना मिळणारा रोजगारही डुबला आहे.
 
बिल्ले, झेंडे, हॅण्डबेल्ट, टोप्या पक्ष मुख्यालयातून
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात टाकण्यात येणारे रुमाल, छातीला लावायचे बिल्ले, मनगटावरील बेल्ट, टोप्या अशा साºया साहित्याची अकोल्यातच छपाई करण्याची सोय आहे; मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसाठी हे सर्व साहित्य त्यांच्या पक्ष मुख्यालयानेच पाठविले असल्याने हे साहित्य तयार करणाऱ्यांनाही रोजगार मिळाला नाही.
 
हॉटेलिंगचा खर्च तुरळकच!
कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली की कार्यकर्ते अधिक जोमाने प्रचाराला लागतात. त्यामुळे नेते व पदाधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांच्या भोजनावळीवर लक्ष देतात. यावेळी मात्र प्रचार संपायला सहा दिवस राहिले असतानाही अशा भोजनावळी तुरळकच दिसत आहेत. कदाचित शेवटच्या दिवसात भोजनावळी वाढण्याची चिन्हे असली तरी सध्या हा खर्च अतिशय तुरळकच आहे.
 
थंड पाण्याची सोय आवर्जून
विविध पक्षांच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी थंड पाण्याची सोय केल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. कार्यकर्त्यांसाठी मिनरल वॉटर तर संध्याकाळी लस्सी, आइस्क्रीम बोलाविण्यात येते. या कार्यालयात मारलेल्या फेरफटक्यातून समोर आले आहे.
 
गेल्या निवडणुकीची तुलना केली तर होर्डिंग छपाईचे काम ७० टक्के कमी आहे. उमेदवारांनी यावर्षी होर्डिंग छपाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी थेट त्यांच्या मुख्यालयातूनच फ्लॅक्स पाठविले आहेत.
-प्रदीप गुरुखुद्दे, प्रिंटिंग व्यावसायिक.
 
यावर्षी बोटावर मोजता येतील एवढीच वाहने भाड्याने गेली आहेत. अकोल्यातील शेकडो गाड्यांना निवडणुकीच्या प्रचाराचे काम मिळाले नाही.
-ठाकूरदास चौधरी, ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक.

 

Web Title:  Lok Sabha Election 2019: Cool Promotions; There is no election mood in the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.