नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम?

By सुधीर लंके | Published: April 22, 2019 11:33 AM2019-04-22T11:33:12+5:302019-04-22T11:42:48+5:30

अहमदनगर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या

Who will kill the city? Sujay Ka Sangram? | नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम?

नगरला बाजी कोण मारणार? सुजय की संग्राम?

googlenewsNext

सुधीर लंके
अहमदनगर : अहमदनगर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. मंगळवारी जनमत यंत्रात बंदिस्त होईल. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत बाजी कोण मारेल हे सांगणे अवघड आहे. कोणत्याही पक्षासाठी ही निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही, हेच चित्र अंतिम टप्प्यात दिसले.
नगर मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. यावेळी भाजपने उमेदवारीत बदल केला. दिलीप गांधी यांच्याऐवजी डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली.राष्ट्रवादीने अखेरच्या टप्प्यात अचानक संग्राम जगताप यांचे नाव पुढे आणले. दोन तरुण चेहऱ्यांमध्ये ही निवडणूक आहे. एक उमेदवार डॉक्टर तर दुसरा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. दोघांच्याही मागे घराण्यांचा वारसा आहे. दोघांचीही प्रबळ संपर्क यंत्रणा या मतदारसंघात आहे. सुजय विखे हे गत दीड-दोन वर्षे या मतदारसंघात आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आपला प्रचार करत होते. त्यामुळे त्यांनी अगोदरच गावोगावी भेटी दिलेल्या होत्या. त्या अर्थाने त्यांचा प्रचार आधीपासूनच सुरु झाला होता. जगताप यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाल्याने त्यांना बांधणीसाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. मात्र, उपलब्ध वेळेतही त्यांनी मतदारसंघात गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न केला.
‘फिर एक बार मोदी सरकार’ हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. सुजय विखे यांनी स्वत:ची प्रतिमा लोकांसमोर आवर्जून मांडण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेचा विकास रखडला असून या भागातील प्रश्न सोडविण्याची क्षमता कोणात आहे ते पाहून मतदान करा, असा मुद्दा त्यांनी मतदारांसमोर मांडला. बाळासाहेब विखे यांचा वारसदार म्हणून संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेना नेहमी जगतापांवर दहशतीचा आरोप करते. कुठल्याही निवडणुकीत त्यांचा हा मुद्दा ठरलेला असतो. यावेळी सुजय विखे यांनीही हा आरोप केला. जगताप यांनी नगर मतदारसंघात काय कामे केली? हा हिशेबही त्यांनी मागितला. दोन महिन्यापूर्वी विखे-जगताप एकत्र होते. आज दोघांनीही एकमेकावर अगदी वैयक्तिक पातळीवर टीका केली. विखे यांच्यासाठी नरेंद्र मोदींची सभा झाली.
राष्ट्रवादीचा भर हा मोदी विरोधावर होता. मोदींनी सर्वांनाच फसविले आहे. त्यामुळे लोक आता भूलथापांना बळी पडणार नाहीत. भाजपला उमेदवार आयात करावा लागला. सुजय विखे हे स्वत:च दोन महिन्यापूर्वी मोदी कसे फसवे आहेत हे सांगत होते. आता ते मोदींचे गुणगाण कसे करताहेत? असा प्रश्न जगताप यांनी केला. विखेंच्या भाषणाचे व्हिडिओच राष्ट्रवादीने व्हायरल केले. विखे यांचे दक्षिणेत अतिक्रमण नको, ते संस्था बळकावतात, असा आरोप जगताप यांनीही केला.
राधाकृष्ण विखे यांच्यावर त्यांच्या परिवारातून अशोक विखे यांनीच आरोप केले. राष्ट्रवादीने या आरोपांचा प्रचारात आधार घेतला.
दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. अगदी वैयक्तिक पातळीपर्यंत आरोप झाले. ही निवडणूक पवार व विखे या दोघांच्याही प्रतिष्ठेची आहे हे म्हटले जाते. ते चित्र प्रचारात दिसले. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते असताना ते भाजपचा प्रचार करतात, अशी तक्रार राष्ट्रवादीने थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे केली. विखेंनीही सुजय विखे यांच्यासाठी काही बैठकांना हजेरी लावलेली दिसली. पवारांना ताटाखालचे मांजर लागतात, असा आरोप त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांवर केला. विखे यांना उघडपणे प्रचार करता आला नाही. ही त्यांची एकप्रकारे अडचण झाली. शरद पवार यांनीही स्वत: तीन सभा घेतल्या. नगरला दोनदा बैठका घेतल्या. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली यंत्रणा जगताप यांच्या पाठिशी उभी केली. त्यांनीही विखेंवर हल्ला चढविला. मुलासाठी आमदार अरुण जगताप हे देखील कंबर कसून होते.
या निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्याप्रमाणेच आमदार शिवाजी कर्डिले यांचीही अडचण झालेली दिसली. विखे यांच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये तेच सुरुवातीला आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादी आपल्या जावयालाच उमेदवारी देऊन संकटात टाकेल याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे जाहीर प्रचार विखेंसोबत मात्र जावई राष्ट्रवादीचा उमेदवार अशी त्यांची अडचण झाली. राधाकृष्ण विखे हे जर काँग्रेसमध्ये राहून आपल्या मुलाचा प्रचार करतात तर तुम्हीही भाजपात राहून जावयाला साथ करा, अशी गळ त्यांना समर्थकांनी अखेरच्या टप्यात घातलेली दिसली. त्यामुळे विखे समर्थक भाजपसोबत तसे कर्डिले समर्थक मनाने राष्ट्रवादीसोबत तर नाहीत ना? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विकासाच्या मुद्यांऐवजी कोणाकडे किती ताकद आहे? याचेच मोजमाप निवडणुकीत अधिक झाले. नेत्यांची डोकी व सभांची गर्दी कुणाकडे यावरच प्रचारात अधिक भर होता. कुकडीचा पाणी प्रश्न, वांबोरी चारी, दुष्काळी तालुके, भकास होत असलेली नगरची औद्योगिक वसाहत, रखडलेले विद्यापीठ उपकेंद्र, उड्डाणपूल यावर म्हणावी तशी चर्चा दोन्हीही बाजूने झाली नाही. मतदारसंघाच्या विकासाचा जाहिरनामा स्वतंत्रपणे समोर आला नाही. आरोप प्रत्यारोप व भाषणांच्या फैरी याभोवती निवडणूक केंद्रीत होती.
मतदारसंघात प्रचंड चुरस आहे. सर्वच तालुक्यांत चुरशीने मतदान होईल असे दिसते. नगर शहरात कोणाला मताधिक्य मिळणार ? यावर बहुतांश गणिते अवलंबून राहतील. गत विधानसभेला नगर शहरात भाजप-सेनेला मिळून ८५ हजार तर दोन्ही कॉंग्रेसला ७६ हजार मते मिळालेली आहेत. दोघांच्या मतात नऊ हजार मतांचा फरक होता. लोकसभेलाही भाजपला नगर शहरात ८९ हजार मते होती. गतवेळी भाजपने नगर व शेवगाव विधानसभा क्षेत्र वगळता इतर सर्वच विधानसभांत एक लाखांपेक्षा अधिक मते घेतली होती.
राष्ट्रवादीला केवळ शेवगाव-पाथर्डीत एक लाख मतांचा टप्पा पार करता आला होता. जो उमेदवार किमान चार विधानसभा मतदारसंघात एक लाख मतांचा टप्पा ओलांडेल तोच विजयाच्या जवळ पोहोचेल.

हे मुद्दे ठरणार प्रभावी
मोदी लाट काय करणार?
शेतकरी, तरुण काय भूमिका घेणार?
मतदानाची टक्केवारी किती राहील?
दिलीप गांधी यांचे समर्थक नेमके कोणासोबत ?
शिवाजी कर्डिले यांचे समर्थक काय करणार?
नगर शहरात शिवसेना किती मतदान घडविणार?
सेना-भाजप एकदिलाने काम करणार का?
काँग्रेस- राष्ट्रवादी एकदिलाने काम करणार का?

Web Title: Who will kill the city? Sujay Ka Sangram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.