एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : शेतकरी भरडले, पाच वर्षे नुसत्या बाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:24 AM2019-04-09T11:24:54+5:302019-04-09T11:26:47+5:30

‘निवडणुका सुरू झाल्यात. दोन्ही बाजूचे उमेदवार अर्ज भरायच्या अगुदर आमच्या गावात येऊन गेले. पण खरं सांगू का...शेतकरी लई भरडलाय’ लोकसभा निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी ‘लोकमत’ने एस. टी. बसमधून ‘लोकमत’ जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या वारीदरम्यान ब्राह्मणीचे सदाशिव हापसे सांगत होते.

 Traveling through a red carpet of ST: Farmers flutter, for just five years | एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : शेतकरी भरडले, पाच वर्षे नुसत्या बाता

एसटीच्या लाल डब्यातून प्रवास : शेतकरी भरडले, पाच वर्षे नुसत्या बाता

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीरामपूर-अहमदनगर 65 कि.मी.

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : ‘निवडणुका सुरू झाल्यात. दोन्ही बाजूचे उमेदवार अर्ज भरायच्या अगुदर आमच्या गावात येऊन गेले. पण खरं सांगू का...शेतकरी लई भरडलाय’ लोकसभा निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी ‘लोकमत’ने एस. टी. बसमधून ‘लोकमत’ जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या वारीदरम्यान ब्राह्मणीचे सदाशिव हापसे सांगत होते.
निवडणुकीतील ‘लोकमत’ चाचपून पाहण्यासाठी सोमवारी सकाळी श्रीरामपूर ते अहमदनगर या ६५ किलोमीटरच्या प्रवासाला एस. टी. बसमधून सुरूवात झाली. सकाळी अकराची हिरव्या रंगाची श्रीरामपूर-पुणे विनाथांबा फुल्ल खचाखच भरलेली होती. उभं रहायलाही जागा नव्हती. कंडाक्टर तिकिटं देऊनही खाली उतरणार होते. ऊन तापायला सुरूवात झाली होती. प्रवाशांच्या अंगातून घाम निघत होता. बुकिंग करून कंडाक्टर ड्रायव्हरकडं प्रवाशांचा रिपोर्ट देऊन उतरला. अन् आमचा श्रीरामपूर-अहमदनगर प्रवास सुरू झाला. हापसे सांगू लागले, शेतकऱ्यांचे लई हाल हायेत. यावर्षी तर दुष्काळात शेतकरी भरडून निघालाय जाम. शेतमालाला काही भाव नाही. कांदा तर पार मातीमोल चाललाय. आमच्या राहुरी तालुक्यात वांबोरी चारी योजना झाली. पण तिला पाणीच सोडत नाहीत, तर तिचा उपयोग काय? निवडणुकीत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्नच दिसत नाहीत. त्याच्यावर कोणीच बोलत नाही. चर्चा करीत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला उमेदवारांना, पुढाºयांना बोलायला वेळ नाही. नुसतेच एकमेकांवर चिखलफेक सुरू झालीय. आताच्या खासदाराने एक सभामंडप तेवढा केलाय आमच्या गावात स्मशानभूमीजवळ. तिकडंबी कोणी जात नाहीत. रस्त्याचे काही कामं सुरू झाले, पण तेबी अर्धे अर्धेच. देवळालीत जाणारा रस्ता पहा, डांबर गायब झालंय. नुसती खडी राहिलीय. नुसता धुराळा उडतोय.’
काय मावशी काय म्हणतीय निवडणूक? शेजारच्या असं विचारल्यावर अंजनाबाई कांदळकर बोलत्या झाल्या,‘कह्याची निवडणूक भाऊ. आपल्या पोटाची खळगी आपल्यालाच भरायचीय ना भाऊ. त्यो मोदी म्हणला व्हता, पंधरा लाख बँकित जमा व्हतील. पण कह्याचं काय? नुसत्याच बाता. पोटाला चिमटा काढून पोरं शिकविलेत. पण त्यांच्या हाताला काम नाही. शिकून सवरून पोरांना नोकºया न्हायीत. काय फायदाहे आपल्याला निवडणुकीचा. समदे सारखेच.’
‘समोसे....समोसे....दस के दो...दस के दो....म्हणत राहुरी बसस्थानकात फेरीवाले बसमध्ये घुसले. कुणाच्या हातात समोसे, कुणाच्या पॉपकॉर्न तर कुणाच्या हातात पाण्याच्या बाटल्या. त्यातल्या हारूणभाईला म्हटलं क्यो भाई क्या बोल रहा है इलेक्शन? तर तो सांगू लागला
‘अपनेकू क्या फायदा है उसका. हम लोग सबेरे आठ-नऊ बजेच बसस्टँड आते है. कोईभी चुनके आया, तोभी अपनेकु ये काम तो करनाच पडता ना. सर्व्हिसवाले, डॉक्टर, बिझनेसवाल्यांना पैशाची हमी तरी हाये. पण आमच्या सारखे हातावर पोट असणारे अन् शेतकºयाचे लय हाल. पण इलेक्शनमधी याच्यावर कोणीच बोलत नाही,’ हारूणभाई प्रवाशांना समोसे देता देता सांगत होते.
राजूरहून नगरला निघालेले सुदामराव गिरवे बसमध्ये बसले. कशी काय निवडणूक? म्हटल्यावर हातातला मोबाईल खिशात टाकल्यानंतर बोलू लागले. ‘काय सांगता येत नाही. पण अवघडच सारं. शेतकºयांचे हाल काही संपायला तयार नाही. हे पहा ना इद्यापीठाजवळ (कृषी विद्यापीठ) मुळा धरणाचं पाणी हाये म्हणून थोडं हिरवंगार तरी दिसतंय. पण दुसरीकडे पाण्यावाचून शेती न् जनावरं मरायला लागलीय. पाच वर्षात नुसत्या बड्या बड्या बाता झाल्या. परतेक्षात काही पदरात पडलं नाही. पोरांना नोकºया नाहीत. पंधरा लाख देऊ म्हटले व्हते. त्याचे पंधरा रूपये अजून कुठं कुणाच्या खात्यात जमा झाले नाहीत. मराठवाड्याच्या शेतकºयांना दुष्काळ अनुदान भेटलंय. पण आपल्याकडं नगर जिल्ह्यात तर ते बी नाही भेटलं.’
खिडकीत कानाला मोबाईलचा इअरफोन लावलेल्या तरूणांना विचारलं मित्रा काय म्हणतेय निवडणूक? तर म्हटला, ‘मूड बरोबर नाहीये माझा. सॉरी बरं का.’ जागा नसल्यामुळे दांडक्याला धरून उभ्याने प्रवास करणारे सोपान जाधव म्हणाले, अहो श्रीरामपूर-नगरला एक तरी बस धड टायमिंगला हाये का? कंट्रोलच नाही कुणाचा’ गप्पा मारतामारता नगरचा सिव्हीलचा स्टॉप आला अन् गप्पांसोबत प्रवासही संपला.

 

 

Web Title:  Traveling through a red carpet of ST: Farmers flutter, for just five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.