श्रीरामपूर : काँग्रेसच्या होमपिचवरच सेनेच्या लोखंडे यांना मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 06:40 PM2019-05-24T18:40:22+5:302019-05-24T18:43:12+5:30

शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला.

Shrirampur: sena candidate sadashiv lokhande lead | श्रीरामपूर : काँग्रेसच्या होमपिचवरच सेनेच्या लोखंडे यांना मताधिक्य

श्रीरामपूर : काँग्रेसच्या होमपिचवरच सेनेच्या लोखंडे यांना मताधिक्य

googlenewsNext

शिवाजी पवार
श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. काँग्रेसचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी राधाकृष्ण विखे यांची केलेली साथ तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेली जवळीक या काही ठळक घडामोडी येथे घडल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे.
आमदार कांबळे यांची स्वत:च्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातच मोठी पिछेहाट झाली. तब्बल २१ हजार ४५८ मतांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी येथून आघाडी घेतली. विशेष म्हणजे माजी आमदार भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक हेदेखील कांबळे यांना आघाडी देऊ शकले नाहीत.
मतदानाच्या ऐन तोंडावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा करण ससाणे यांनी राजीनामा दिला. त्यांनी समर्थकांसमवेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची साथ केली. श्रीरामपूर शहर व ग्रामीणमध्ये त्यांनी लोखंडे यांच्याकरिता मोर्चा सांभाळला. कांबळे यांना पराभूत करण्याचा विडाच त्यांनी उचलला होता.
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी हा घटनाक्रम घडला. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील प्रचाराचे मुद्देच बदलले गेले. विखे-थोरात लढतीचेच त्याला स्वरुप आले. ससाणे यांनी घेतलेला हा निर्णय सध्या तरी त्यांच्यासाठी फायद्याचाच ठरला. शहरात माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, दिलीप नागरे, मुक्तार शाह, मुजफ्फर शेख, किरण परदेशी, शशांक रासकर, मनोज लबडे, रितेश रोटे, आशिष धनवटे, दिलीप सानप, राजेंद्र सोनवणे, मुन्ना पठाण यांनी मोर्चा सांभाळला. त्यामुळे शहरातूनच लोखंडे यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे कांबळे यांची कोंडी झाली. विखे यांची खेळी निर्णायक ठरली. ग्रामीणमध्येही सभापती सचिन गुजर यांनी काम पाहिले. सध्याच्या स्थितीत नगरपालिकेत करण ससाणे हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे तुर्तास तरी स्थानिक आघाडी तयार करून ते राजकीय प्रवास सुरू ठेवतील. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षासोबत राहतील. अशा स्थितीत भाजपचे जुने निष्ठावान प्रकाश चित्ते काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. याला कारण म्हणजे विखे हे ससाणे यांनाच ताकद देण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्टÑवादीपुढे सेना-भाजप युतीचे मोठे आव्हान
श्रीरामपूर विधानसभेवर या निकालांचा मोठा परिणाम होणार आहे. ससाणे हे सेना-भाजप तर मुरकुटे हे काँग्रेसच्या बाजूने झुकले आहेत. त्यामुळे त्यांच्याच उमेदवारांत लढत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना श्रीरामपुरात अवघी ६ हजार ३९२ मते मिळाली. त्यांनी कपाळमोक्ष करुन घेतला आहे.

विद्यमान आमदार
भाऊसाहेब कांबळे। काँग्रेस

 

Web Title: Shrirampur: sena candidate sadashiv lokhande lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.