नगर शहरातील मतांसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:12 PM2019-04-20T12:12:48+5:302019-04-20T12:15:07+5:30

दक्षिण लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत नगर शहराने भाजपचे दिलीप गांधी यांना ताकद दिली होती़

Races like city corporation votes | नगर शहरातील मतांसाठी रस्सीखेच

नगर शहरातील मतांसाठी रस्सीखेच

googlenewsNext

अण्णा नवथर
अहमदनगर : दक्षिण लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत नगर शहराने भाजपचे दिलीप गांधी यांना ताकद दिली होती़ त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शहरातील मतदारांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मागे ताकद उभी केली होती़ विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांनी झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरकरांनी सेना-भाजपला कौल दिला़ आता संदर्भ बदलले असून, लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस व सेना-भाजप एकत्र आले आहेत़ त्यामुळे दोघांना शहरातून मताधिक्य मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार हे निश्चित आहे़
गेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातून भाजपाचे दिलीप गांधी यांना ८९ हजार २५८ तर, राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांना ५० हजार ९९३ मते मिळाली होती़ लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेली २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप, या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविली़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी पाचवेळा आमदार राहिलेल्या सेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला़ विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांनी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत सेनेने पुन्हा मुसंडी मारली़ सेनेने ६८ पैकी २४ जागा जिंकत शहरावरील वर्चस्व पुन्हा सिध्द केले़ सर्वात कमी १४ जागा मिळविलेल्या भाजपला पाठिंबा देत राष्ट्रवादीने सेनेला सत्तेपासून दूर ठेवले़ सध्याच्या लोकसभा निवडणुकीत मात्र राजकीय समीकरणे बदललेली आहेत़ सेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुकीला सामोरे जात आहेत़ त्यामुळे मागील दोन निवडणुकांतील बळ कायम राखण्याचे आव्हान आघाडी व युतीच्या नेत्यांसमोर आहे़ एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीत शहरातील मतदारांची भूमिका महत्वाची असून, या मतदारांचा कौल मिळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली आहे़

लोकसभा २०१४
दिलीप गांधी (भाजप)- ८९,२५८
राजीव राजळे (राष्ट्रवादी)- ५०,९९३

विधानसभा २०१४
संग्राम जगताप (राष्ट्रवादी)- ४९,३७८
अनिल राठोड (शिवसेना)- ४६,०६१
सत्यजित तांबे ( काँग्रेस)- २७,०७६
अ‍ॅड़ अभय आगरकर (भाजप)-३९,९१३

महापालिकेतील संख्याबळ
शिवसेना- २४
राष्ट्रवादी- १८
भाजप- १४
काँग्रेस- ५
बसपा- ४
अपक्ष- १

 

Web Title: Races like city corporation votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.