Lok Sabha Election 2019 : ‘सु’विजयासाठी सोशल मीडियावर प्रचार युद्धाचा ‘रण’ संग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:59 PM2019-04-10T13:59:19+5:302019-04-10T14:02:29+5:30

तळपत्या उन्हात प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला असून, हायटेक प्रचारासाठी पुन्हा एकदा सोशल मीडिया केंद्रस्थानी आहे़

Lok Sabha Election 2019: campaign on social media 'war' | Lok Sabha Election 2019 : ‘सु’विजयासाठी सोशल मीडियावर प्रचार युद्धाचा ‘रण’ संग्राम

Lok Sabha Election 2019 : ‘सु’विजयासाठी सोशल मीडियावर प्रचार युद्धाचा ‘रण’ संग्राम

googlenewsNext

अहमदनगर: तळपत्या उन्हात प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला असून, हायटेक प्रचारासाठी पुन्हा एकदा सोशल मीडिया केंद्रस्थानी आहे़ व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरवर उमेदवाराची महती सांगणाऱ्या पोस्ट, पोवाडे, उडत्या चालीची गाणी, व्हिडिओ अन् लाईव्ह सभांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ विजयासाठी सध्या सोशल मीडियावर रंगलेला प्रचार युध्दाचा रणसंग्राम स्मार्टफोनधारक अनुभवत आहेत़
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत़ सभा, बैठका व भेटीगाठींमधून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे़ प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे कुणालाच शक्य नसल्याने उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे़ सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की, निवडणुकांच्याच पोस्टचा सामना करावा लागत आहे़ तरुणांसह ज्येष्ठ मतदारही मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा वापर करतात़ हायटेक प्रचारासाठी उमेदवारांसाठी ही जमेची बाजू आहे़
जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी ‘वॉररुम’ तयार केल्या आहेत़ यात सोशल मीडियावरील प्रचारासाठी स्वतंत्र टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत़ या टीमकडून व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर नेत्यांची भाषणे, प्रचारफेरी, भेटीगाठी यासह प्रचारार्थ विविध मेसेज अपलोड केले जात आहेत़ प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही सोशल प्रचारात मागे नाहीत़ सोशल मीडियाच्या प्रचारावर निवडणूक आयोगाची मात्र बारीक नजर आहे़

कार्यकर्त्यांमध्ये परस्परविरोधी शेरेबाजी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सध्या १९ उमेदवार रिंगणात असले तरी दोन प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच सोशल वॉर रंगलेले दिसत आहे़ यात प्रचार पोस्टमधून एकमेकांना शेरेबाजी सुरू आहे़ आपलाच पक्ष आणि आपलाच नेता कसा चांगला आहे, हे सांगण्याचा कार्यकर्त्यांकडून आटापिटा सुरू आहे़

राष्ट्रीय विषयांवर टीकाटिप्पणी
स्थानिक उमेदवारांच्या प्रचारासह सोशल मीडियावर राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रीय विषयांवरूनही टीकाटिप्पणी सुरू आहे़ यातून आपला पक्ष आणि उमेदवाराची इमेज तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ सोशल मीडियावर सुरू असलेल्या संवादातून अनेकवेळा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद होताना दिसतो़

येथे राजकारण नको प्लिज़़़पण लक्ष देतो कोण
स्मार्टफोनधारक व्हॉटस्अ‍ॅप अनेक ग्रुपचे सदस्य आहेत़ काही ग्रुप अ‍ॅडमिन आपला ग्रुप राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत़ येथे कुठलीही राजकीय पोस्ट टाकू नये असे सांगितले जाते़ मात्र अ‍ॅडमिनचे कुणीच ऐकताना दिसत नाही़ राजकीय पोस्ट टाकण्याचा मोह कुणालाच आवरत नाही़ त्यामुळे अनेक अ‍ॅडमिनसाठी व्हॉटस्अ‍ॅप गु्रप सध्या डोेकेदुखी ठरले आहेत़

Web Title: Lok Sabha Election 2019: campaign on social media 'war'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.