साथी हाथ बढाना : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना कार्यकर्त्यांची फळी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:23 PM2019-04-10T13:23:41+5:302019-04-10T13:27:36+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघातील शिवसैनिक मैदानात उतरले आहेत

Increasing partners: Shiv Sena workers join hands for campaigning for BJP candidate | साथी हाथ बढाना : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना कार्यकर्त्यांची फळी जोमात

साथी हाथ बढाना : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना कार्यकर्त्यांची फळी जोमात

googlenewsNext

सुदाम देशमुख
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघातील शिवसैनिक मैदानात उतरले आहेत. प्रचार फेऱ्या, बैठकांमध्ये शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. विखे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पदाधिकारी नियोजन करीत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी शिवसैनिक स्वत:हून प्रचारात उतरल्याचे प्रथमच दिसत आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या कोट्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला आहे. यापूर्वी तीनवेळा खासदार राहिलेल्या दिलीप गांधी यांच्यासाठी मात्र नगर शहरात शिवसेनेची प्रचार यंत्रणा कधी राबलेली पहायला मिळाली नाही. सध्या डॉ. विखे यांच्यासाठी मात्र शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे पायाला भिंगरी लावून प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक आपापल्या प्रभागात बैठका, प्रचार फेऱ्यांचे नियोजन करीत आहेत. प्रभागातील प्रचाराची जबाबदारी नगरसेवकांवर देण्यात आली आहे. अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे हे विखे यांच्या विजयाचे आवाहन करून विरोधकांवर तोफ डागत आहेत. विखे यांना शहरात राठोड यांची साथ मिळाली आहे. चितळे रोडवरील कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी असते. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी राठोड हे दिवसभर शिवसेनेच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. याशिवाय नियोजित प्रचार फेºया, सभा, बैठकांसाठी ते जातीने हजर राहत आहेत.
ग्रामीण भागातही प्रा. गाडे यांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी जोमाने विखे यांच्या प्रचारात उतरले आहेत. भाजपचा उमेदवार असला तरी शिवसेनेच्या गोटातही उत्साह पहायला मिळत आहे. विखे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शहर व अहमदनगर मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अहमदनगर :नगरमधील चितळे रोडवरील शिवसेनेच्या कार्यालयातून डॉ. विखे यांच्या प्रचाराचे नियोजन केले जात आहे. विखे यांचे प्रतिनिधी दिवसभर सेनेच्या संपर्क कार्यालयाशी संपर्कात आहेत. तिथे नियोजन, ऐनवेळचा बदल, फेरी, बैठका यावर चर्चा होते. राठोड यांच्या सूचनेप्रमाणे शहरात सेनेच्या कार्यक्षेत्रात प्रचार केला जात आहे. नगर तालुक्यात प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, राजेंद्र भगत, काशिनाथ दाते, शरद झोडगे, गोविंद मोकाटे, रामदास भोर, प्रवीण कोकाटे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यांसह कार्यकर्ते सक्रिय आहेत.

पाथर्डी-शेवगाव : पाथडीमध्ये अनिल कराळे, रफीक शेख, भाऊसाहेब धस, अंकुश चितळे हे सेनेचे आजी-माजी पदाधिकारी विखे यांच्या प्रचारात आहेत. पाथर्डीत शिवसेनेचा प्रभाव कमी असला तरी जे आहेत ते सर्व कार्यकर्ते विखे यांच्यासाठी प्रचार करीत आहेत. शेवगावमध्ये शिवसेना केवळ नावापुरतीच दिसते. त्यांचा म्हणावा तेवढा प्रचारात सहभाग दिसलेला नाही. स्थानिक पदाधिकारी भरत लोहकरे, एकनाथ कुसळकर, अविनाश मगरे आदी सेनेचे पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत.

पारनेर : पारनेरमध्ये भाजपच्या प्रचाराची सर्व सूत्रे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी यांच्याकडे आहेत. औटी यांच्या कार्यालयातून प्रचाराची यंत्रणा कार्यान्वित होते. औटी यांच्या कार्यालयात दिवसभर भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांच्या प्रचाराची लगबग सुरू असते. विकास रोहोकले, गणेश शेळके, रामदास भोसले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत.

कर्जत-जामखेड : जामखेडमध्ये शिवसेनेचे कार्यालय नाही. मात्र सेनेचे अविनाश बेलेकर, संजय काशिद, ऋषिकेश साळुंखे आदी सेनेचे पदाधिकारी सक्रिय आहेत. जामखेड शहरात कार्यालय नसले तरीही सेनेचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करताना दिसत आहेत. कर्जतमध्ये पहिल्या दिवसांपासूनच शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या व्यासपीठावर आहेत. राजेंद्र दळवी, पप्पू शहाणे, बळीराम यादव या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक भाजपचा प्रचार करीत आहेत. कर्जतमध्ये सेनेचे संपर्क कार्यालय नाही, मात्र भाजपच्या सभा, बैठकांमध्ये शिवसैनिक सक्रिय दिसत आहेत.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व तसेच फारच कमी आहे. भाऊसाहेब गोटे, नंदकुमार तरटे, हरिभाऊ काळे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी डॉ. विखे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेनेचे कार्यालयही नसल्याने शिवसैनिक भाजप नेत्यांच्या संपर्कात राहून प्रचार करीत असल्याचे दिसते.

राहुरी : उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख विजय ढोकणे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या सभा, प्रचार फेºयांना हजेरी लावत आहेत. शहरात सेनेचे संपर्क कार्यालय नाही. भाजपच्या प्रचारनियोजनाप्रमाणे शिवसैनिक सकीय झाले आहेत. शिवसेनेने स्वत:हुन कोणतीही यंत्रणा राबविलेली नसली तरी भाजपच्या यंत्रणेतच शिवसैनिक सहभागी आहेत.

 

Web Title: Increasing partners: Shiv Sena workers join hands for campaigning for BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.