Maharashtra Election 2019 ; Yavatmal faces a crushing blow to the end | Maharashtra Election 2019 ; यवतमाळचा सामना शेवटपर्यंत चुरशीचा

Maharashtra Election 2019 ; यवतमाळचा सामना शेवटपर्यंत चुरशीचा

ठळक मुद्देमतमोजणी केंद्राबाहेर गर्दीच गर्दी : शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कार्यकर्त्यांची जत्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी यवतमाळ मतदारसंघाच्या निकालाने गुरूवारी शेवटपर्यंत चुरस कायम राखली. अत्यंत अटीतटीच्या या सामान्यात मतमोजणीची प्रत्येक फेरी कधी काँग्रेस तर कधी भाजपच्या बाजूने झुकत गेली. एकंदर २९ फेऱ्यांपैकी शेवटच्या पाच फेऱ्यांनी तर संपूर्ण जिल्ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. शेवटी रात्री आठ वाजता शेवटची फेरी संपली आणि भाजपचे मदन येरावार अवघ्या २२५३ मतांनी विजयी ठरले.
जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उमेदवारीमुळे यवतमाळ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. त्याचवेळी काँग्रेसने जनमानसात लोकप्रिय प्रतिमा असलेल्या बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात भाजपला तगडे आव्हान दिले होते. २१ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतरच या सामन्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून धामणगाव मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. ही मतमोजणी सुरूवातीपासून काँग्रेससाठी आशादायक ठरली. बॅलेट पेपर मोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांनी मतांची आघाडी घेतली. त्यापुढे होत गेलेल्या प्रत्येक फेरीत बाळासाहेबांचा ‘लिड’ कायम राहिला. २० फेऱ्या आटोपल्यावरही काँग्रेसची आघाडी कायम होती. मात्र काँग्रेस आणि भाजप उमेदवाराच्या मतांतील फरक दीड हजार ते तीन हजारांच्या आसपास राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत विजयाची आशा सोडलेली नव्हती.
सकाळी शासकीय तंत्रनिकेतनच्या बाहेर मोजक्याच कार्यकर्त्यांची गर्दी होती. मात्र प्रत्येक फेरीत काँग्रेसची आघाडी कायम दिसत असताना गर्दीही वाढत गेली. तर २० व्या फेरीनंतर अचानक भाजप उमेदवार मदन येरावार यांच्या मतात वाढ होऊ लागली. भाजपच्या कार्यकर्त्यांची या परिसरात प्रचंड गर्दी केली. मांगूळकर आणि येरावार यांच्या मतातील अंतर काही शेकड्यांवर येऊन ठेपले. अचानक मदन येरावार यांनी उसळी घेत २५ व्या फेरीपासून आघाडी मिळविली. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकेल की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त होऊ लागली. मात्र अत्यंत रोमांचक मतमोजणीच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर भाजपचे मदन येरावार यांनी विजय मिळविला.

जिल्हाभरातून फोनाफोनी
जिल्ह्यातील इतर सहा मतदारसंघांचे निकाल सायंकाळी सातपूर्वी निश्चित झाले. काही ठिकाणी जाहीरही झाले. मात्र यवतमाळ मतदारसंघातील २९ फेºया संपण्यासाठी रात्रीचे आठ वाजले. त्यातही काँग्रेस-भाजपच्या मतातील अत्यल्प फरक पाहता येथील निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. इतर मतदारसंघातील लोकही यवतमाळातील आप्तमित्रांना फोन करून परिस्थिती जाणून घेत होते. दिवसभर चाललेल्या २० फेऱ्यातील काँग्रेसची आघाडी ठाऊक असलेल्या अनेकांना तर शेवटच्या काही फेऱ्यांमधील भाजपच्या मताधिक्यावर विश्वासही बसत नव्हता. मात्र शेवटी भाजपने बाजी मारलीच.

अंतिम क्षणी आकड्यांची फेकाफेकी
मतमोजणी जसजशी शेवटाकडे सरकू लागली, तसतशी ‘यवतमाळचे काय झाले’ या एकाच प्रश्नाने साºयांना भंडावून सोडले. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी आपापल्या पद्धतीने मतांचे आकडे पुढे केले. कोणी मांगूळकर दीड हजारांनी पुढे तर कोणी येरावार फक्त साडेतीनशे मतांनी पुढे अशा आवया उठविणे सुरू केले. मात्र रात्री आठ वाजता शेवटची २९ वी फेरी आटोपली आणि भाजपचे मदन येरावार यांनी २२५३ मतांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Yavatmal faces a crushing blow to the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.