डहाणूत आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:41 IST2019-12-24T00:40:43+5:302019-12-24T00:41:56+5:30
प्रगतीशील शेतकऱ्याचा उपक्रम : तलासरीच्या बोरीगावात १0 वर्षांपासून स्थानिकांकडून मिश्र शेती

डहाणूत आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : तलासरी तालुक्यातील बोरिगावचे प्रगतीशील शेतकरी यज्ञेश सावे दहा वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डहाणूतील ब्राह्मणवाडी येथील रणवीर सिंग यांनीही या पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे.
महाराष्ट्र - गुजरात सीमेवर बोर्डी रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला यज्ञेश सावे राहतात. विविध प्रकारच्या फळबागायती आणि भाजीपाला पिकांच्या मिश्र पद्धतीच्या लागवडीसाठी प्रगतीशील शेतकरी असा त्यांचा लौकिक आहे. ते दहा वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवड करतात. यासाठी ते पुणे येथून रोपे आणतात. ही तयार फळे लगतच्या उंबरगाव शहरातील फळ व्यापाऱ्यांना विकतात. नोबेल जातीच्या या फळांची वाढ आणि चव अन्य जातींपेक्षा या भागात चांगली आहे. थंडीप्रमाणेच उन्हाळ्यातही हे पीक घेतले होते. मात्र मोठ्या प्रमाणात उत्पादन येत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. आता डहाणूतही अशाप्रकारे स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचा उपक्रम सुरू झाला आहे.
रणवीर सिंग हे मूळचा हरियाणा येथील असून आठ महिन्यांपूर्वी त्यांनी मित्रासोबत भागीदारीत ब्राह्मणवाडी येथे ७ एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली. त्यापैकी अर्ध्या एकरात त्याने महाबळेश्वरच्या वाई येथून ८ हजार रोपे आणून लागवड केली. त्यासाठी दीड लाख रुपये उत्पादन खर्च येणार असून, जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ५ लाख उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, महाबळेश्वर सारख्या थंड वातावरणाचा येथे अभाव आहे. रणवीर सिंग यांना हरियाणा येथे या पीक लागवडीचा एक तपाचा अनुभव असून तेथे दहा एकरात लागवड केली होती. मात्र तेथे मार्केट नसल्याने हा प्रयोग येथे राबविण्याचे ठरवले. सध्या फळे लगडण्यास सुरुवात झाली आहेत.
एका एकरात ३० हजार रोपे, पाच लाख खर्च
च्स्ट्रॉबेरीसाठी महाराष्ट्रात महाबळेश्वर येथेयेथे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. एका एकरात ३० हजार रोपे लागवड करता येतात. यासाठी वर्षाला ५ लाख रुपये खर्च होतात. यातून जवळपास खर्च काढून ५ ते ६ लाख अपेक्षित नफा आहे.
च्लागवडीनंतर दोन महिन्यात उत्पन्न सुरू होते. वर्षातून ४ ते ८ महीने उत्पन्न मिळते. घाऊक बाजारात दोन किलो कॅरेटला ४०० ते ५०० रुपये इतका भाव आहे. या फळात विटामिन (सी) आणि ओमेगा ३ असून शुगरफ्री फळ असल्याने याला मागणी जास्त आहे.
डहाणूतील युवकाकडून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग झाल्याचे ऐकून आनंद झाला. दहा वर्षांपासून मी या पिकाचे उत्पादन घेऊन स्थानिक बाजारात विक्री करतो. मात्र या पिकाला येथील वातावरण तितकेसे पोषक नसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न येत नाही.
- यज्ञेश सावे, प्रगतीशील शेतकरी, बोरीगाव/तलासरी