Voting percentage decreased this time compared to the previous one | गतवेळीच्या तुलनेत यंदा घटला मतदानाचा टक्का

गतवेळीच्या तुलनेत यंदा घटला मतदानाचा टक्का

ठळक मुद्देवर्धा विधानसभा क्षेत्राचा आलेख उतरताच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष मतदानाचा टक्काच घटल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे गत तीन वर्षांपासून वर्धा विधानसभा क्षेत्राचा प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उतरता असून निवडणूक विभागानेही विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट व देवळी हे चार विधानसभा क्षेत्र आहेत. आर्वी विधानसभा क्षेत्रात २००९ मध्ये ६७.३५ टक्के, २०१४ मध्ये ६८.१३ टक्के नागरिकांनी मतदान केले होते. तर यंदा ६७.२५ टक्के नागरिकांनी मतदान केले. देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६६.१८ टक्के, २०१४ मध्ये ६७.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर यंदा ६३.४९ टक्के नागरिकांनी मतदान केले. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६७.७६ टक्के, २०१४ मध्ये ७१.७५ टक्के प्रत्यक्ष मतदान केले होते. तर यंदा ६४.५१ टक्के नागरिकांनी मतदान केले. तसेच वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात २००९ मध्ये ६०.७६ टक्के, २०१४ मध्ये ५८.१८ टक्के मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले होते. तर यंदा ५३.१४ टक्के नागरिकांनी मतदान केले.

Web Title: Voting percentage decreased this time compared to the previous one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.