There is no immersion of Ganesh idol in the 'Dham' river this year | यंदा पवनारच्या ‘धाम’ नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन नाहीच
यंदा पवनारच्या ‘धाम’ नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन नाहीच

ठळक मुद्देपोलीस छावणीचे येणार स्वरूप : प्रदूषण टाळण्यासाठी कुंडाचा वापर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या पवनार येथील धाम नदीत गत अनेक वर्षांपासून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. परंतु, यंदा धाम नदीच्या पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन होणार नसून पवनार येथे नदी काठावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. केवळ कृत्रिम कुंडात विसर्जन न होऊ शकणाऱ्या मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात होणार आहे. नदी प्रदुषित होऊन नये तसेच सर्वाच्च न्यायालायाच्या आदेशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन त्यावर अंमल करणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच विसर्जन उत्सवादरम्यान खाकी वर्दी धाऱ्यांच्या बंदोबस्तामुळे पवनारला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे.
विसर्जन उत्सवादरम्यान पवनार येथील धाम नदी पात्रात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे वास्तव आहे. जीवितहाणी टाळण्यासाठी तत्कालीन ठाणेदार वासेकर यांच्या कार्यकाळात पोलीस विभागाने प्रभावी नियोजन करून त्यावर अंमल केला. शिवाय मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या कुठल्याही नागरिकाला नदी पात्रात जाण्यासाठी मज्जावही करण्यात आला. मूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवकांची नियुक्तीही केली होती. याच स्वयंसेवकांना नदी पात्रात उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलीस अधिकारी वासेकर यांची वडनेर येथे बदली झाल्यानंतर सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांनी त्यांनी आखलेल्या नियोजनावरच काम केल्याने मागील तीन वर्षांत गणपती विसर्जन उत्सवादरम्यान पवनार येथे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तर याच दरम्यान पवनार ग्रा.पं. प्रशासनाच्या पुढाकाराने पवनारच्या धाम नदी पात्रात कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले. याच कुंडात यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

६० गृहरक्षक देणार सेवा खडा पहारा
पवनार येथील धाम नदी परिसरातील नंदी व छत्री घाट परिसरात विसर्जन उत्सवादरम्यान गणेश भक्तांचा मेळाच फुलतो. या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी तसेच ६० गृहरक्षक खडा पहारा देणार आहे. शिवाय वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक पोलीसही येत्या गुरूवारी व शुक्रवारी सेवा देणार आहेत. बुधवारी त्याची रंगीत तालीम होणार आहे.

मागणीपेक्षा मिळते कमी मनुष्यबळ
सेवाग्राम पोलीस ठाण्याच्यावतीने वरिष्ठांशी पत्र व्यवहार करून विसर्जन उत्सवादरम्यान लावण्यात येणाºया बंदोबस्तासाठी मनुष्यबळाची मागणी करण्यात येते. परंतु, मागणीपेक्षा कमीच मनुष्यबळ अधिकाºयांकडून दिले जात आल्याचे वास्तव आहे. यंदाही सेवाग्राम ठाण्याच्यावतीने आठ वाहतूक पोलीस, ५० पोलीस कर्मचाºयांची मागणी करण्यात आली आहे.

धाम नदी प्रदुषित होऊ नये तसेच सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन गणेश भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन पवनार येथील धाम नदीच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात करावे. तसेच विसर्जन उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम.

Web Title: There is no immersion of Ganesh idol in the 'Dham' river this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.