Maharashtra Election 2019 ; Voters will be welcomed at polling stations on the theme of Diwali | Maharashtra Election 2019 ; दिवाळीच्या थिमवर मतदान केंद्रांवर होणार मतदारांचे स्वागत

Maharashtra Election 2019 ; दिवाळीच्या थिमवर मतदान केंद्रांवर होणार मतदारांचे स्वागत

ठळक मुद्देस्वागतासाठी रांगोळ्या, पुष्प व मिठाई : मतदान केंद्रांची आकर्षक सजावट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकशाहीचा महाउत्सव २१ ऑक्टोबरला साजरा होत आहे. महाराष्ट्र विधानसभा विनडणुकीसाठी सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात होणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी अवघा महाराष्ट्र मतदान करणार आहे. मतदारांच्या स्वागतासाठी वर्धा जिल्हा मागे नसून जिल्ह्यातील ४० केंद्रांवर मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे रांगोळ्या, गुलाबपुष्प व मिठाई देऊन दिवाळीच्या थिमवर स्वागत करण्यात येणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारराजाने उत्साहाने मतदान करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रांना रांगोळ्या तसेच विविध डेकोरेटिव्ह साधनांनी सजविले आहे. मतदान केंद्राच्या दारावर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी येणाºया प्रथम मतदाराचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची जबाबदारी संचालिका स्वाती वानखेडे सांभाळत आहेत. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत असून महिला बचतगटाच्या सदस्य गणवेशात मतदारांच्या स्वागतासाठी हजर असणार आहेत. यासोबत दिव्यांग मतदार, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला इत्यादींचे स्वागत होणार असून त्यांना मतदान करण्यासाठी सहाय्यक असणार आहेत. त्याचप्रमाणे चार विधासभा क्षेत्रात ६ सखी मतदान केंद्रे, ५ आदर्श मतदान केंद्र मतदारांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत. सखी मतदान केंद्रे महिला अधिकारी कर्मचारीद्वारा संचालित असणार आहेत. यात पंचायत समिती सभागृह कारंजा, जिल्हा परिषद मुलींची शाळा खोली क्रमांक ७, आर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र.३ पुलगाव, नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल नगर परिषद नवीन इमतारत पुलगाव, सेंट जॉन हायस्कूल हिंगणघाट व जिल्हा परिषद इमारत सभागृह वर्धा यांचा समावेश आहे. यावेळी दिव्यांग मतदान केंद्र ही संकल्पनासुद्धा तीन केंद्रांवर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात १३९ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणे व प्रोत्साहित करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत. मतदारांनी स्वागताचा स्वीकार करावा व उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, सीईओ डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
लोकसभा निवडणुकीत झालेली कमी मतदान लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता विविध उपाययोजना केल्या आहेत. विविध शाळांच्या माध्यमातून मतदारांत जनजागृती, चुनावी पाठशाळा आदी उपक्रम राबविण्यात आले. मतदारांनी उत्साहाने मतदान करावे यासाठी नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Voters will be welcomed at polling stations on the theme of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.