Maharashtra Election 2019 ; Voters to face 'surgical strike' | Maharashtra Election 2019 ; पक्षांकडून मतदारांचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

Maharashtra Election 2019 ; पक्षांकडून मतदारांचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

ठळक मुद्देजबाबदार कार्यकर्त्यांवर धुरा : प्रशासनाचाही असेल ‘वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवडणुकीत आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व क्लृप्त्या अजमावल्या जाणार आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध प्रलोभने दाखवण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. यासाठी ‘मतदारांचे सर्जिकल स्ट्राईक’ या सांकेतिक नावाने मते फोडण्याचे काम मतदानाच्या दोन दिवस आधी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा अशा घडामोडींवर लक्ष ठेवून राहणार आहे. ज्यांच्याकडे या सर्जिकल स्ट्राईकची जबाबदारी दिली आहे, त्यांना सर्वांच्या नजरा चुकवून हा टास्क पूर्ण करावा लागणार आहे.
चारही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचाराचे रान पेटवून दिले आहे.
प्रचारसभा, गाठीभेटी यावर भर देत असताना मतदारांना आपल्याकडे वळवण्याची संधी कोणताच राजकीय पक्ष सोडणार नसल्याचे दिसून येते. मतदारांना त्यासाठी विविध प्रलोभने दाखवण्यात येण्याची शक्यता गृहित धरून निवडणूक विभागाने भरारी पथक, चेकपोस्ट यांच्या माध्यमातून मतदारासंघात मतदारांना दाखवण्यात येणाऱ्या आमिषांवर करडी नजर ठेवली आहे. राजकीय पक्षांनीही सावधगिरी बाळगून आपला मतदार हा आपल्याकडे कसा राहील याची खबरदारी घेतली आहे.
प्रशासन सज्ज
मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्यांवर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे, तसेच त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे या आधीच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे तथा निवडणूक निर्णय अधिकारी निरीक्षकांनी पत्रकार परिषदेमधून स्पष्ट केले आहे. प्रशासनाचा वॉच राहणार असल्याने मतदारांचे सर्जिकल स्ट्राइक करण्याची जबाबदारी दिलेल्या कार्यकर्त्यांची खरी कसोटी असल्याचे बोलले जाते.
मतासाठी दिली जाणार आमिषे
उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी विशेष कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्या कार्यकर्त्यांकडे लिस्ट तयार असल्याचेही बोलले जाते.
त्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना विविध आमिष दाखवून आपल्याच उमेदवाराला मत देण्याबाबत गळ घालण्यात येणार आहे. दिलेल्या जबाबदारीची उघड चर्चा न करण्याची तंबी संबंधितांना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्याची चर्चा आहे.
यासाठी ‘मतदारांचे सर्जिकल स्ट्राईक’ या सांकेतिक भाषेचा वापर करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मतदारांना हेरल्यानंतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचून मतदारांना आपल्याकडे वळवून तेथून तातडीने बाहेर पडणार आहेत. कारण निवडणूक यंत्रणेसह अन्य उमेदवारांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या नजरा चुकवून त्यांना ही कारवाई करावी लागणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Voters to face 'surgical strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.