Maharashtra Election 2019 ; The right to vote for 4697 disabled voters | Maharashtra Election 2019 ; ४ हजार ६९७ दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Maharashtra Election 2019 ; ४ हजार ६९७ दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

ठळक मुद्दे९२२ व्हीलचेअर उपलब्ध । ३ हजार ३१२ दिव्यांग सहाय्यक नियुक्त, सुविधा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील ४ हजार ६९७ दिव्यांग मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक दिव्यांग सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिव्यांग मतदारांना मतदान करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ९२२ व्हीलचेअरसह ३,३१२ दिव्यांग सहाय्यक मतदानासाठी सहाय्य करणार आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आढावा बैठकीत ही माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड, स्विपचे नोडल अधिकारी व गटविकास अधिकारी आणि सर्व नगरपालिका, नगर पंचायतचे मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित होते.
आर्वी विधानसभा क्षेत्रात १,७३१, देवळी १,०४४, हिंगणघाट १,२२६ व वर्धा विधानसभा क्षेत्रात ६८६ अशा एकूण ४,६९७ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी केंद्रावर ९२२ व्हीलचेअर असणार आहेत. त्याचप्रमाणे ३३१२ दिव्यांग सहाय्यकाची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या गृहभेटीवर भर देण्यात येणार आहे.
दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी सर्व मतदान केद्रांवर रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, पुरेशी वीज, प्रतीक्षागृह, शौचालय, फर्निचर आदी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. १६ ऑक्टोंबर रोजी नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग सहाय्यकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, अशा मतदान केंद्रांचा कारणासह अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या. मतदान कमी असलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारणमिमांसा करावी, असे ते म्हणाले. या मतदान केंद्रावर मतदान जागृती कार्यक्रम आयोजित करावे. यात नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असावा असेही त्यांनी सांगितले. मतदान जागृती कार्यक्रमाचा पुढील दहा दिवसाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले नाही, अशा मतदारांच्या भेटी घेऊन विधानसभा निवडणुकीत मतदान करणार असे संकल्पपत्र भरून घेण्यात आले आहे. मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत चारही विधानसभा मतदारसंघात चित्ररथ, पथनाट्य, मतदार रॅली, चुनावी पाठशाला, गृहभेटी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदान जागृती सुरू आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अघिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The right to vote for 4697 disabled voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.