Maharashtra Election 2019 ; The need for transformation for the development of the Deoli constituency | Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात विकासासाठी परिवर्तनाची गरज
Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात विकासासाठी परिवर्तनाची गरज

ठळक मुद्देखासदार तडस : विविध गावांमध्ये जाहीर सभा व बैठका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास मागील २० वर्षांपासून पूर्णपणे रखडला आहे. लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत असून विकासाच्या आशेवर असलेला मतदार यावेळी परिवर्तन घडवून आणेल व विधानसभेत शिवसेना भाजपचा भगवा या मतदारसंघातून जाईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.
शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार रामदास तडस यांच्या शुक्रवारी आंजी (मोठी), वायफड, गुंजखेडा, इंझाळा, भिडी, अंदोरी, कानगाव, अल्लीपूर, वायगाव, तरोडा या गावांमध्ये बैठका व जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी खासदार रामदास तडस बोलत होते.
रामदास तडस म्हणाले, भाजप शिवसेना सरकारच्या काळात आपण संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा विकास केला. देवळी गावात अनेक योजना आणून या गावाचा चेहरामोहरा बदलविला. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. त्यांचे विकासाकडे दुर्लक्ष आहे. निवडून गेल्यानंतर साडेचार वर्षांनंतरच त्यांचे दर्शन मतदारांना होते, अशी टीका खा. तडस यांनी केली. समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागातील या दौऱ्याला मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. गावागावांत ‘समीर देशमुख आगे बढो’चे नारे कार्यकर्ते देत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, भाजपचे नेते मिलिंद भेंडे, पंकज घोडमारे यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवळी भागाच्या विकासाला गती देण्यासाठी नवे नेतृत्व विधानसभेत पाठवा, असे आवाहन शहागडकर व भेंडे यांनी जाहीर सभांमधून केले.


Web Title: Maharashtra Election 2019 ; The need for transformation for the development of the Deoli constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.