Maharashtra Election 2019 ; Leaving 'polling' parties with literature | Maharashtra Election 2019 ; साहित्य घेऊन ‘पोलिंग’ पार्ट्या रवाना

Maharashtra Election 2019 ; साहित्य घेऊन ‘पोलिंग’ पार्ट्या रवाना

ठळक मुद्दे१,३१४ केंद्रांवरून होणार मतदान : ४७ उमेदवार आजमावताहेत राजकीय भाग्य

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकशाही उत्सवाचा आज खरा दिवस असल्याने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली कंबर कसली असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न केले आहे. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा या चारही मतदार संघात १ हजार ३१४ केंद्रांवर मतदान होणार असल्याने रविवारी सकाळपासूनच प्रत्येक मतदारसंघात नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते. त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते निवडणूक साहित्य प्रदान करण्यात आले. महामंडळाच्या १३७ बसगाड्यांसह खासगी वाहनांनी पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या.

मतदान पथकाने शांततेत काम करावे - रणबीर शर्मा
वर्धा येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांनी मतदान साहित्य वितरित करून पोलिंग पाटी रवाना केल्या. यावेळी निवडणूक निरीक्षक रणबीर शर्मा, जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, महेंद्र सोनोणे आदींची उपस्थिती होती. मतदान पथकाला पुरविण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वाचावे तसेच आयोगाने दिलेले विविध अर्जाचे नमुने जबाबदारीने त्यांनी भरावे. निवडणुकीदरम्यान कुठलीही अडचण आल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. मतदान पथकाने कुठलाही ताण न घेता शांततेत काम करावे, अशा सूचना याप्रसंगी निवडणूक निरीक्षक रणबीर शर्मा यांनी दिल्या.

मतदान करतेवेळी ‘सेल्फी’ काढणाऱ्यांवर होणार कारवाई
आर्वी येथे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक तर हिंगणघाट येथे चंद्रभान खंडाईत तर देवळी येथे मनोज खैरनार यांच्या नेतृत्वात रविवारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय पथकांना रवाना करण्यात आले. मतदान पथकाने मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरुप मतदान घेणे अनिवार्य आहे. यात कमीत कमी ५० मत टाकणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करावी. मतदानासाठी असलेले साहित्य संबंधितांनी काळजीपूर्वक तपासावे. कुठल्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र व पोस्टर मतदान केंद्रात नसावे. असल्यास ते झाकून ठेवावे. विशेष म्हणजे, मतदान करतेवेळी फोटो, व्हिडिओ अथवा सेल्फी काढण्यावर बंदी आहे. तसे आढळल्यास केंद्र प्रमुखाने तातडीने पोलिसांना कळवावे, असा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Leaving 'polling' parties with literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.