Maharashtra Election 2019 ; After defeat, Ranjit Kamble supporters burst into flames | Maharashtra Election 2019 ; पराभवानंतर रणजित कांबळे समर्थकांचा वर्ध्यात फटाके फोडून जल्लोष

Maharashtra Election 2019 ; पराभवानंतर रणजित कांबळे समर्थकांचा वर्ध्यात फटाके फोडून जल्लोष

ठळक मुद्देमहादेवराव ठाकरेंच्या पुतळ्याला केले अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाच्या विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा पराभव झाल्यानंतरही माजी राज्यमंत्री व देवळी येथून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे समर्थकांनी वर्धा शहरात ठाकरे मार्केट परिसरात येत फटाके फोडून जोरदार जल्लोष केला. यावेळी देवळी मतदार संघातून आमदार राहिलेले महादेवराव ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला त्यांनी मालार्पण केले.
रणजित कांबळे यांच्या विजयाचा देवळीत जल्लोष साजरा करीत असताना वर्धा येथे येऊन पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असतानाही फटाके फोडून या पराभवाचा आनंद कांबळे समर्थकांनी व्यक्त केला. यावेळी देवळी विधानसभा संघातील कांबळेंचे खंदे समर्थक उपस्थित होते. कुठलीही परवानगी न घेता कांबळे समर्थकांनी दुचाकीवर येऊन ठाकरे मार्केट परिसरात फटाके फोडले, याची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी या परिसरात येत या प्रकाराची चौकशी केली. तोपर्यंत रणजित कांबळे समर्थकांनी धूम ठोकली होती. या घटनेमुळे रणजित कांबळे यांचा शेंडे यांच्या पराभवात सक्रिय सहभाग असावा, अशी शक्यता आता बळावली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रणजित कांबळे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय मोतीलाल जयस्वाल यांनी सेलू येथे आपल्या परिवारातील इमारतीवर भाजप उमेदवाराचे फलक लावले होते. याची माहिती शेंडे समर्थकांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांना पूर्वीच दिली होती. शिवाय तसे छायाचित्रही टोकस यांना दाखविले होते. रणजित कांबळे समर्थकांचा जल्लोष परिसरातील अनेक लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला, हे तेवढेच खरे. कांबळे समर्थकांनी ठाकरे मार्केटसमोर केलेला जल्लोष शहरातील शेंडे समर्थकांसाठी मात्र, जिव्हारी लागणारा विषय ठरला.

टोकस ठरल्या खऱ्या काँग्रेसी
वर्धा मतदार संघात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी विशेष लक्ष घातले होते. नामांकनपत्र भरण्यापासून त्या हजर होत्या. एवढेच नव्हे, तर त्यांचे समर्थक असलेले वर्धा शहर काँगे्रसचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनीसुद्धा शेंडे यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून घेतले होते.
आर्वी मतदार संघात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली. या सभेला अमर काळे, शेखर शेंडे हे दोन उमेदवार हजर होते. मात्र, देवळीचे उमेदवार रणजित कांबळे यांनी या सभेलाही दांडी मारली. चारूलता टोकस यांनी या सभेत काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. देवळी मतदार संघात मात्र टोकस प्रचारासाठी फार फिरल्या नाहीत. याचीही चर्चा निवडणुकीत होती.

Web Title: Maharashtra Election 2019 ; After defeat, Ranjit Kamble supporters burst into flames

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.