कमी वेळात खूप जास्त वजन कमी करणं अनेकांना स्वप्नासारखं वाटतं, परंतु याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अचानक आणि वेगाने वजन घटवल्यामुळे शरीरात अशक्तपणा, हार्मोनल असंतुलन, पित्ताशयातील खडे आणि अगदी अवयवांचं नुकसान होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशीच एक घटना चीनमधील हांगझोउ शहरातून समोर आली आहे, जिथे एका २६ वर्षीय तरुणीने अवघ्या दोन महिन्यांत सुमारे १५ किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिला 'प्री-डायबेटीस' असल्याचं निदान झालं.
शियाओयू नावाची ही तरुणी आपल्या जिवलग मैत्रिणीच्या लग्नासाठी लवकरात लवकर स्लिम होऊ इच्छित होती. यासाठी तिने जी पद्धत अवलंबली, तिला 'डेव्हिल वेट-लॉस प्लॅन' असं म्हटलं जात आहे. या प्लॅनअंतर्गत तिने आपल्या आहारातून सर्व मुख्य अन्नपदार्थ पूर्णपणे वगळले आणि केवळ थोड्या प्रमाणात भाज्या खाण्यास सुरुवात केली. यासोबतच ती दररोज खूप व्यायाम करायची आणि अनेकदा १० किलोमीटरपेक्षा जास्त धावत असे.
या कठोर दिनचर्येचा परिणाम लवकरच दिसून आला आणि लग्नापूर्वीच शियाओयूचं वजन ५० किलोपर्यंत कमी झालं. सुरुवातीला तिला या बदलाचा खूप आनंद झाला, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. लवकरच तिला सततचा थकवा, प्रचंड तहान लागणं, खूप भूक लागणे, चक्कर येणं आणि हृदयाचे ठोके वाढणं यासारख्या त्रासांना सामोरं जावं लागलं. शियाओयूने हांगझोउ येथील एका रुग्णालयातील एंडोक्राइनोलॉजी विभागात डॉक्टरांशी संपर्क साधला. तपासणीत असं दिसून आलं की, तिची 'फास्टिंग ब्लड शुगर' आणि जेवणानंतरची ग्लुकोज लेव्हल सामान्य पेक्षा खूप जास्त होती. या लक्षणांच्या आधारे डॉक्टरांनी तिला 'प्री-डायबेटीस' असल्याचं सांगितलं.
डॉक्टर काय म्हणतात?
डॉक्टरांच्या मते, तिने कार्बोहायड्रेट्स घेणं पूर्णपणे बंद केलं होतं आणि त्यासोबतच ती हाय-इंटेन्सिटी व्यायाम करत होती. यामुळे शरीरातील इन्सुलिनचं संतुलन बिघडलं, स्नायू आणि पाण्याची मोठी कमतरता निर्माण झाली आणि मेटाबॉलिझ्मचं गंभीर नुकसान झालं. आजाराचं निदान झाल्यानंतर शियाओयूने आपल्या जीवनशैलीत बदल केला. तिने संतुलित आहार घेण्यास सुरुवात केली आणि अत्यंत कठीण व्यायामाऐवजी मध्यम स्वरूपाचा एरोबिक व्यायाम सुरू केला. तीन महिन्यांनंतर तिचं वजन ५२.५ किलोवर स्थिरावलं आणि तिच्या प्रकृतीतही मोठी सुधारणा झाली.
काय असतो 'डेव्हिल वेट-लॉस प्लॅन'?
'डेव्हिल वेट-लॉस प्लॅन' ही कोणतीही मान्यताप्राप्त डाएट पद्धत नाही. यामध्ये अत्यंत कमी कॅलरी घेणं आणि अतिप्रमाणात व्यायाम करणं यांचा समावेश असतो. डॉक्टरांचे स्पष्ट म्हणणं आहे की, ही पद्धत दीर्घकाळ टिकणारी नाही आणि सुरक्षितही नाही. निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी हळूहळू, संतुलित आणि सायंटिफिक पद्धतींचा अवलंब करणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
Web Summary : A 26-year-old in China developed pre-diabetes after losing 15 kg in two months using a 'devil weight-loss plan.' The plan involved severely restricting food and excessive exercise, leading to hormonal imbalance and metabolic damage. Doctors advise balanced diets and moderate exercise for safe weight loss.
Web Summary : चीन में एक 26 वर्षीय युवती को 'डेविल वेट-लॉस प्लान' का उपयोग करके दो महीने में 15 किलो वजन कम करने के बाद प्री-डायबिटीज हो गया। इस प्लान में भोजन को गंभीर रूप से प्रतिबंधित करना और अत्यधिक व्यायाम शामिल था, जिससे हार्मोनल असंतुलन और मेटाबोलिक क्षति हुई। डॉक्टर सुरक्षित वजन घटाने के लिए संतुलित आहार और मध्यम व्यायाम की सलाह देते हैं।