Weight Loss Drug Impact On Eyes : वाढतं वजन किंवा लठ्ठपणा ही जगातील एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे भरपूर लोक चिंतेत आहेत. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काहींना फायदा मिळतो तर काहींना मिळत नाही. तसंही वजन कमी करणं काही खायचं काम नाही. त्यासाठी भरपूर नियमांचं पालन करावं लागतं. तर दुसरीकडे काही लोक असेही आहेत ज्यांना लवकर वजन कमी करायचं असतं. मग ते यासाठी औषधं घेतात. बाजारात वजन कमी करणारी अनेक औषधं आली आहेत. मात्र, अलिकडेच करण्यात आलेला रिसर्चमधून समोर आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.
JAMA Network Open वर प्रकाशित दोन रिसर्चमधून याबाबत खुलासा करण्यात आलाय. या रिसर्चच्या निष्कर्षांमुळे जगभरात चर्चा सुरू झाली आहे की, खरंच वजन कमी करण्याच्या औषधांनी डोळ्यांचं नुकसान होतं का?
कोणती आहेत औषधं?
Semaglutide हे GLP-1 हार्मोनसारखं औषध आहे. ज्याने भूक कमी होते आणि सोबतच ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल केली जाते. हे औषध टाइप २ डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वापरलं जातं.
Tirzepatide हे आणखी एक औषध GLP-1 सोबतच GIP हार्मोनसारखं काम करतं. ज्यानं इन्सुलिन रिलीज आणि वजन कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
या रिसर्चमध्ये या औषधांचा दोन गंभीर आजारांशी संबंध जोडण्यात आला आहे. एक म्हणजे Diabetic Retinopathy, यात जास्त काळ ब्लड शुगर जास्त राहिल्यानं रेटिनामधील नसा डॅमेज होतात, ज्यामुळे व्यक्ती दृष्टीहीनही होऊ शकते. तर दुसरा आजार आहे NAION (Non-arteritic Anterior Ischemic Optic Neuropathy) यात डोळ्यांच्या नसांमध्ये ब्लड फ्लो कमी झाल्यानं अचानक दृष्टी जाऊ शकते.
काय सांगतो रिसर्च?
पहिल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, टाइप २ डायबिटीसमध्ये GLP-1 औषध घेणाऱ्या रूग्णांची तुलताना इतर औषधं घेणाऱ्यांशी करण्यात आली. यात आढळून आलं की, GLP-1 औषधांमुळे वरील दोन आजारांचा धोका थोडा जास्त होता.
दुसऱ्या रिसर्चमध्ये अधिक पॉवरचं GLP-1 औषध (Semaglutide, Tirzepatide) घेणाऱ्यांमध्ये NAION आणि इतर Optic Nerve Disorders च्या केसेस सामान्य वाढल्याचं आढळून आलं.
यासंबंधी रिसर्च करण्याची वेळ आली कारण १० वर्षांआधी Semaglutide च्या सुरूवातीच्या ट्रायलमध्ये Diabetic Retinopathy चा धोका वाढण्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर हाय-रिस्क रूग्णांना पुढच्या ट्रायलमधून बाहेर ठेवण्यात आलं. अलिकडच्या एका रिसर्चमध्ये NAION च्या केसेस वाढल्यावर दोन मोठे रिसर्च करण्यात आले. यूरोपिअन मेडिसीन एजन्सीनुसार, Semaglutide घेणाऱ्या १० हजारांपैकी एका व्यक्तीमध्ये NAION होऊ शकतो.
मग औषधं घ्यायची की नाही?
तर यावर एक्सपर्ट औषधं बंद करू नका असं सांगतात. कारण ही औषधं डायबिटीस आणि लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहेत. सोबतच यांचा हृदय, किडनी आणि लिव्हरवरही सकारात्मक प्रभाव दिसून आला.
काय काळजी घ्याल?
- जर आपल्याला आधीच Diabetic Retinopathy आजार असेल तर त्यांनी औषध सुरू करण्याआधी किंवा डोज वाढवण्याआधी व नंतर डोळ्यांची टेस्ट केली पाहिजे.
- डोजमध्ये अचानक वाढ किंवा कमी करू नका, जेणेकरून ब्लड शुगरमध्ये अचानक बदल होणार नाही.
- औषधं घेत असाल तर डॉक्टरांच्या संपर्कात रहा, त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्या.