अनेक जण प्रामाणिकपणे आहाराचे नियम, व्यायाम, पाणी पिणे, सारे करतात. तरीही वजन कमी होत नाही. मग नक्की चुकतं कुठे? वजन कमी करण्याच्या प्रवासात अनेक सूक्ष्म गोष्टी आपण दुर्लक्षित करतो आणि त्याच लहान चुका मोठा फरक घडवतात.
सर्वप्रथम आहारातील चुकांकडे बघूया. अनेकदा लोक डाएट म्हणताच अन्न कमी खाणं सुरु करतात. पण हे उलट परिणाम करतं. (Diet and exercise are not helping you lose weight? 5 things you do wrong every day.)शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्याने मेटाबॉलिझम मंदावतो आणि चरबी कमी होण्याऐवजी साठत जाते. जास्त वेळ उपाशी राहणं, साखर आणि प्रक्रियायुक्त अन्न (जसे की पॅकेज फूड, बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक) घेणं या सवयी वजन कमी होण्याऐवजी वाढवतात.
दुसरं म्हणजे झोप आणि ताण. अपुरी झोप घेतल्यास शरीरातील हार्मोन्स बिघडतात. लेप्टिन आणि घ्रेलिन हे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात, त्यामुळे भूक वाढते, सतत काहीतरी खआण्याची सवय लागते. ताणही तसाच घातक. कॉर्टिसोल नावाचं हार्मोन चरबी साठवण्याचं काम करतं. ताण असेल तर हा हार्मोन वाढतो.
व्यायामातील चूकही महत्त्वाची आहे. रोज एकच व्यायाम केल्याने शरीर त्याला सरावतं आणि परिणाम थांबतात. कार्डिओसोबत थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग (जसे की वजन उचलणे, योगा, प्लँक इत्यादी) आवश्यक असतं. तसेच, व्यायामानंतर लगेच जंक फूड खाल्लं, तर सर्व मेहनत वाया जाते. त्यामुळे रोज एकच व्यायाम न करता विविध प्रकार करा. पाणी कमी पिणं ही आणखी एक दुर्लक्षित चूक आहे. शरीर डिहायड्रेट झालं की मेटाबॉलिझम कमी होतो, त्यामुळे चरबी घटण्याचा वेग कमी होतो. दिवसातून किमान ७-८ ग्लास पाणी घेणं आवश्यक आहे.
आणखी एक कारण म्हणजे अनियमित जीवनशैली. अनियमित वेळेवर जेवण, रात्री उशिरा खाणं, सतत बसून राहणं या सवयी शरीराचं संतुलन बिघडवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धीराचा अभाव. वजन कमी होणं ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. काही दिवसांत परिणाम न दिसल्यामुळे हार मानणं हीच सर्वात मोठी चुक आहे.
