Join us

World Emoji Day : चॅट करताना कळतील ना तुला माझ्या इमोजीखुणा?-शब्दांपेक्षा इमोजीच्या प्रेमात जेन झीची भाषा

By चैताली मेहेंदळे | Updated: July 17, 2025 17:39 IST

World Emoji Day : Gen Z's language , trend of using Emojis, chatting can not be done without using emoji : इमोजी वापरण्याची नवीन पद्धत तर जाणून असालच. पण नक्की कशी झाली सुरवात आणि काय हेतू? काय आहे ही डिजिटल संकल्पना.

आजकाल विविध सोशल मिडिया साईट्समुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेला माणूस कोणाशीही संवाद साधू शकतो. आता दूर राहणाऱ्या व्यक्तीला फोन करुन हालहवाल विचारण्याऐवजी लोक मेसेज करुन गप्पा मारतात. त्यासाठी वॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे तसेच फेसबुकही आहे. गप्पा मारण्यात लोकं तासंतास घालवतात. नवी पिढी तर खटाखट मेसेज टाईप करुन चॅटींग करते. (World Emoji Day : Gen Z's language , trend of using Emojis, chatting can not be done without using emoji.  )चॅटींगच्या या जमान्यात शब्दांपेक्षा जास्त इमोजीच वापरले जातात. जपानमध्ये राहणाऱ्या शिगेताका कुरीता या व्यक्तीने पहिला इमोजी तयार केला होता. बघताबघता जगभरातील सगळ्या कंपन्यांनी ही कल्पना उचलली आणि विविध प्रकारच्या भावना-हावभाव दर्शवणारे इमोजी तयार केले. हसण्या रडण्यापासून लाजण्यापर्यंत सगळ्या भावनांचे इमोजीमध्ये रुपांतर करण्यात आले. 

या संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद पाहून इमोजीपिडियाचा संस्थापक म्हणजेच जेरेमी बर्ज याने जागतिक इमोजी दिवस साजरा करायला सुरवात केली. १७ जुलै हा दिवस जगभरातून इमोजी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. इमोजीची मुळात निर्मिती ज्या हेतूने करण्यात आली होती, तो साध्य होताना दिसतो. ऑनलाईन संवाद साधताना समोरच्याला आपण पाहू शकत नाही, हावभाव आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे चॅटींग जास्त प्रभावी व्हावे तसेच भावना स्पष्टपणे समोरच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी इमोजी तयार करण्यात आले.

२००० सालापासून इमोजींचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढू लागला. २०१० मध्ये, युनिकोड कन्सोर्टियमने इमोजींचा समावेश केला. ज्यामुळे ते विविध प्लॅटफॉर्म्स आणि ऑपरेटिंग सिस्टिम्सवर वापरणे शक्य झाले. त्यानंतर, अ‍ॅपल, गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांनी इमोजींचा समावेश केला. 

कमी मजकूर लिहून त्याला जास्त प्रभावी करण्यासाठी इमोजी वापरले जातात. आता इमोजी हा डिजिटल संवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नवी पिढी ज्यांना जेनझी म्हणून संबोधले जाते, ती पिढी तर इमोजी वापरल्याशिवाय संवाद साधतच नाही. वेळेनुसार अनेक इमोजींचे अर्थही बदलत गेले. जसे की रडण्याचा इमोजी हसण्यासाठी वापरला जाऊ लागला. इमोजीचा व्यवस्थित वापर करता येणे हे एक कौशल्यच आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. चुकीचा इमोजी पाठवल्यास चुकीच्या भावना समोरच्यापर्यंत जाऊ शकतात. इमोजींचा वापर कमी होणे आता शक्य नाही. मात्र एकेका इमोजीच्या संज्ञेत बदल सातत्याने होत राहतो. ते जाणून घेण्यासाठी ही तरुणपिढी कायम अप टू डेट असते. बटणांचे साधे मोबाइल वापरलेली पिढी मात्र इमोजी वापरताना फार भयंकर आणि मजेशीर चुका करताना आपल्याला दिसते. 

भावनाच नाही तर हवामान, अन्न, खेळ, वाहतूक अशा इतरही अनेक गोष्टींचे प्रतिक असलेले अनेक इमोजी आहेत. मर्यादित मजकूरात जास्त माहिती लिहिण्यासाठी इमोजीची मदत होते. या इमोजींमध्ये सातत्याने भर पडते. ते ही मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. एकही शब्द न वापरता इमोजीद्वारे संवाद अनेक जण साधतात. सांकेतिक भाषेचा हा भाग नाही, मात्र संवादाची वेगळी भाषा डिजिटल जगात तयार झाली आहे हे मात्र नक्की.      

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामव्हॉट्सअ‍ॅपफेसबुकडिजिटल