वाढतं वजन, लठ्ठपणा ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. अनेकजण जिम, डाएटिंग किंवा योगासनं करून वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र, चीनमध्ये सध्या वजन कमी करण्यासाठी एक अतिशय वेगळी आणि कडक पद्धत वापरली जात आहे, ज्याला 'फॅट प्रिझन्स' किंवा 'वेट लॉस कॅम्प्स' म्हटलं जात आहे. ही केंद्र म्हणजे लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेलं एक प्रकारचं 'शिस्तप्रिय जेल'च आहेत.
काय आहे ही संकल्पना?
चीनमधील या केंद्रांना 'जेल' म्हणण्याचं कारण म्हणजे तिथली कठोर शिस्त. येथे येणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने काहीही करता येत नाही. एकदा का तुम्ही या कॅम्पमध्ये प्रवेश घेतला, की तुमचं आयुष्य तिथल्या प्रशिक्षकांच्या हातात असतं. हे कॅम्प शहरापासून दूर, शांत ठिकाणी असतात, जेणेकरून बाहेरील जगाचा किंवा खाण्यापिण्याच्या पदार्थांचा मोह होणार नाही. या एका महिन्याच्या कोर्ससाठी १००० डॉलर्स म्हणजेच जवळपास ९०,२६९ रुपये खर्च करावे लागतील.
कसं असतं दिवसभराचं वेळापत्रक?
या 'फॅट प्रिझन्स'मधील दिनचर्या अत्यंत कडक असते.
व्यायाम - सकाळी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यायाम करून घेतला जातो. यामध्ये धावणं, पोहणं, वजन उचलणं आणि तासनतास चालणं यांचा समावेश असतो.
अन्नपदार्थांवर नियंत्रण - घरासारखे किंवा हॉटेलसारखे पदार्थ मिळत नाहीत. आहारतज्ज्ञांनी ठरवून दिलेला अत्यंत मोजका आणि पौष्टिक आहारच घ्यावा लागतो. बाहेरील जंक फूड किंवा साखरेचे पदार्थ आणण्यास सक्त मनाई असते.
मोबाईलवर बंदी - अनेक केंद्रांमध्ये मोबाईल वापरण्यावर मर्यादा असतात, जेणेकरून लोकांचं लक्ष विचलित होणार नाही आणि ते मानसिकदृष्ट्या व्यायामासाठी तयार राहतील.
१० ते २० किलो वजन कमी झाल्याचा अनुभव
चीनमध्ये सध्या स्पर्धात्मक वातावरण आणि कामाचा ताण वाढल्यामुळे तरुणांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. जेव्हा स्वतःहून वजन कमी करणं शक्य होत नाही, तेव्हा ही तरुण मुलं-मुली या कॅम्पचा पर्याय निवडत आहेत. येथील कडक वातावरणामुळे केवळ काही महिन्यांतच १० ते २० किलो वजन कमी झाल्याचं अनेक अनुभव समोर आले आहेत.
सोशल मीडियावर या 'फॅट प्रिझन्स'चे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही लोक म्हणतात की, ही पद्धत अतिशय जाचक आहे आणि यामुळे शरीरावर ताण येतो. पण दुसऱ्या बाजूला ज्यांना शिस्त लावून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे वरदान ठरत आहे. चीनमधील या 'वेट लॉस' मॉडेलची आता जगभरात चर्चा होत आहे.
