सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बंगळुरूमधील बिशप कॉटन स्कूलमधील शिपाई ३८ वर्षांच्या सेवेनंतर शेवटची घंटा वाजवताना दिसत आहे. हाच घंटा वाजण्याचा आवाज गेली कित्येक वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात घुमत होता, ज्यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. निरोप देताना विद्यार्थी भावुक झाले.
इन्स्टाग्रामवर एका युजरने शेअर केलेल्या या व्हिडीओला १९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दास काका शेवटच्या वेळी शाळेची घंटा वाजवतात तेव्हाचा भावनिक क्षण आता व्हायरल होत आहे. ते असे करताच सर्वांच्या चेहऱ्यावर विविध भावना आणि हास्य दिसतं. घंटा वाजताच विद्यार्थी टाळ्या वाजवतात आणि आनंद साजरा करतात, यावेळी अनेकांचे डोळे पाणावतात.
सोशल मीडियावरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "३८ वर्षांनंतर, दास काकांनी शेवटची घंटा वाजवली. शाळेतील प्रत्येक सकाळ संस्मरणीय बनवणारा हा माणूस. त्यांचं हास्य, त्यांचे शांत भाव, त्यांची उपस्थिती - हे सर्व शाळेच्या हृदयाच्या ठोक्यांचा भाग होतं. आज, जेव्हा त्यांनी त्यांची शेवटची घंटा वाजवली, तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक करतो. या काकांमुळे वेळ ओळखीची झाली होती."
व्हायरल व्हिडीओ शाळेच्या भिंतीपलीकडेही हृदयाला स्पर्शून गेला. लोकांनी दास अंकलच भरभरून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांच्या शाळेतील हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्या आहेत. आपल्या शाळेतील शिपाई काकांबद्दल सांगितलं आहे. या व्हिडीओने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.