मुंबईतील आयआयटी ग्रॅज्युएट कपल अमन गोयल आणि त्यांची पत्नी हर्षिता श्रीवास्तव यांनी घरकामांना कंटाळून एक असं पाऊल उचललं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कपलवरच्या जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या होत्या की, घरातलं काम करणं, घर सांभाळणं कठीण झालं होतं. म्हणून त्यांनी महिन्याला तब्बल १ लाख पगार देऊन प्रोफेशनल होम मॅनेजर ठेवला.
अमन (आयआयटी बॉम्बे) आणि हर्षिता (आयआयटी कानपूर) आपल्या प्रोफेशनल जीवनात इतके व्यस्त आहेत की त्यांच्यासाठी रोजची घरगुती कामं तणावपूर्ण बनली. म्हणून त्यांनी जेवणाचा प्लॅन, कपडे धुणं, घरकाम आणि देखभाल यासह सर्व कामं एका तज्ज्ञाकडे सोपवली. अमनने स्पष्ट केलं की, "आम्ही एका होम मॅनेजरला नियुक्त केलं जो सर्वकाही सांभाळतो. यामुळे आम्हाला आमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येतं."
"मला माझ्या पालकांवर ओझं लादायचं नाही"
होम मॅनेजर याआधी हॉटेल चेनमध्ये ऑपरेशन्स हेड म्हणून काम करत होता. आता, तोच प्रोफेशनल सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घरात काम करतो. तो प्रत्येक गरजेचे नियोजन करतो, कामं वाटून देतो आणि सर्वकाही सुरळीतपणे चालू ठेवतो. या व्यवस्थेमुळे या जोडप्याला तसेच त्यांच्यासोबत राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध पालकांना दिलासा मिळाला आहे. अमन म्हणतो की, "मला माझ्या पालकांवर ओझं लादायचं नाही. त्यांना त्यांचं जीवन आरामात जगता आले पाहिजे आणि प्रवास करता आला पाहिजे. माझ्यासाठी ते अधिक महत्त्वाचं आहे."
होम मॅनेजरला दरमहा १ लाख पगार
अनेकांना ही रक्कम जास्त वाटत असली तरी, त्यांचा वेळ या कपलसाठी खूपच मौल्यवान आहे. अमन म्हणतो की, "आम्ही एका होम मॅनेजरला दरमहा १ लाख रुपये देतो. ते महाग असू शकतं, परंतु आम्ही ते परवडत आहे आणि ती आमच्या वेळेची खरी किंमत आहे." त्याने सोशल मीडियावर असेही शेअर केले की त्याला एका खास प्लॅटफॉर्मद्वारे होम मॅनेजर सापडला.
प्रोफेशनल होम मॅनेजरचा ट्रेंड
मोठ्या शहरांमध्ये प्रोफेशनल जीवनातील दबाव वाढत असताना, घरगुती जबाबदाऱ्यांसाठी लोकांना नियुक्त करण्याचा ट्रेंड देखील वाढत आहे. आधुनिक कुटुंबं वेळ, सुविधा आणि मनःशांतीला प्राधान्य देतात, त्यासाठी पैसे खर्च करतात. या जोडप्याची गोष्ट सांगते की लोक वेळेचे मूल्य आणि जीवनाच्या सोयीसाठी नवीन पर्याय शोधत आहेत. भविष्यात, प्रोफेशनल होम मॅनेजर घरांचा एक सामान्य भाग बनू शकतात.
