वाढत्या महागाईत बचत करणं हे सर्वसामान्यांसाठी एक मोठं आव्हान बनत आहे. याच दरम्यान शिक्षण केवढं महागलं हे समजल्यावर मोठा धक्का बसेल. सोशल मीडियावर एका युजरने आपल्या नर्सरीमध्ये शिकणाऱ्या लेकीच्या शाळेचं फी स्ट्रक्चर शेअर केलं आहे. ज्यामध्ये मुलीची नर्सरीची वार्षिक फी तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
एका आईने नर्सरीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या फी स्ट्रक्चरचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये फी स्ट्रक्चरमध्ये लिहिलं आहे की, मुलीच्या नर्सरी क्लासची वार्षिक फी २,५१,००० रुपये आहे. ज्यामध्ये ट्यूशन, एडमिशन, इनिशिएशन आणि रिफंडेबल डिपॉजिट याचा समावेश आहे. ही रक्कम चार हप्त्यांमध्ये घेतली जाते - पहिला हप्ता ७४ हजार आणि इतर तीन प्रत्येकी ५९ हजारांचे आहेत.
अनुराधा तिवारी (@talk2anuradha) ने मुलीच्या नर्सरीच्या फी स्ट्रक्चरचा चार्ट पोस्ट केला आहे आणि एकूण फी मोजली आहे. "नर्सरी क्लासची फी- २ लाख ५१ हजार. आता ABCD शिकण्यासाठी तुम्हाला महिन्याला २१ हजार रुपये खर्च करावे लागतील. इतक्या जास्त फीचं समर्थन करणाऱ्या या शाळा नेमकं काय शिकवत आहेत?" असा सवाल विचारला आहे.
फी चार्टमध्ये वर्ग PP1 आणि PP2 तसेच पहिली ते पाचवीपर्यंतच्या फीचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. जी जवळपास ३ लाख २२ हजारांपर्यंत आहे. आतापर्यंत ही पोस्ट ७ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. १० हजारांहून अधिक युजरनी ती लाईक केली आहे. तसेच पोस्टवर १८०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. लोक आपल्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.