आजच्या डिजिटल युगात प्रवास करणं महाग होत चाललं आहे, विशेषतः युरोपीय शहरांमध्ये जिथे हॉटेल आणि एअरबीएनबीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा काळात 'किंड्रेड' (Kindred) नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म समोर आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, लोक 'होम स्वॅपिंग'च्या माध्यमातून राहण्यासाठी स्वस्त पर्याय शोधत आहेत.
'Kindred' त्यांना मदत करत आहे. ही एक रेंटल वेबसाइट असून ती 'गिव्ह-टू-गेट' या मॉडेलवर आधारित नेटवर्क आहे. यामागची मुख्य संकल्पना अशी आहे की, तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे दुसऱ्या सदस्यासाठी उघडता आणि त्या बदल्यात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या दुसऱ्या सदस्याच्या घरात राहण्याचा अधिकार मिळवता. हे केवळ सदस्यांसाठी असलेलं होम स्वॅपिंग नेटवर्क आहे, जिथे लोक एकमेकांच्या घरांची अदला बदल करून परवडणाऱ्या दरात प्रवास करतात. किंड्रेडच्या मदतीने युजर्स जास्त पैसे खर्च न करता जगातील विविध शहरांमध्ये स्थानिक लोकांप्रमाणे राहू शकतात.
किंड्रेड नक्की काय आहे?
किंड्रेड ही एक विश्वासार्ह होम एक्सचेंज कम्युनिटी आहे, जी २०२२-२३ च्या सुमारास सुरू झाली. हा प्लॅटफॉर्म भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही जोडतो. येथे मेंबरशिप फ्री आहे, परंतु सामील होण्यासाठी अर्ज करावा लागतो. तुमचं घर स्वच्छ, सुसज्ज आणि पर्यटकांसाठी सोयीचं असणं आवश्यक आहे. अर्ज मंजूर झाल्यावर तुम्ही या नेटवर्कचा भाग बनता. सध्या किंड्रेडकडे उत्तर अमेरिका आणि युरोपमधील १०० हून अधिक शहरांमध्ये २,२०,००० पेक्षा जास्त घरं उपलब्ध आहेत.
"गिव्ह ए नाईट, गेट ए नाईट"
किंड्रेडचा मूळ नियम "गिव्ह ए नाईट, गेट ए नाईट" असा आहे. नवीन सदस्यांना सुरुवातीला ५ क्रेडिट्स मिळतात, ज्याचा वापर करून ते कोणालाही आपल्या घरी न बोलावता ५ रात्री कुठेही राहू शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला तुमच्या घरी राहण्याची संधी देता, तेव्हा तुम्हाला प्रति रात्र १ क्रेडिट मिळतं. या क्रेडिट्सच्या मदतीने तुम्ही इतर सदस्यांच्या घरात राहण्यासाठी बुकिंग करू शकता.
खर्च आणि सुरक्षा घर बदलताना कोणत्याही रोख रकमेची देवाणघेवाण होत नाही. पाहुणे फक्त 'क्लीनिंग फी' आणि 'सर्व्हिस फी' देतात. सरासरी एका आठवड्याच्या सहलीचा एकूण खर्च ५०० डॉलर्सपेक्षा कमी येतो, तर न्यूयॉर्कसारख्या शहरात हॉटेल किंवा एअरबीएनबीसाठी २००० डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. किंड्रेड स्वतः प्रोफेशनल क्लीनिंगची व्यवस्था करतं. घरमालकाला १,००,००० डॉलर्सपर्यंतचं संरक्षण विमा कवच मिळतं आणि सहलीपूर्वी व्हिडिओ कॉलद्वारे सदस्य एकमेकांना ओळखून अप्रूव्ह देतात.
