पालक पनीर खाल्ल्याबद्दल एखाद्याला २ लाख डॉलर्स (अंदाजे १ कोटी ८० लाख रुपये) नुकसान भरपाई मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? अमेरिकेत असाच एक प्रकार आता समोर आला आहे, जिथे दोन भारतीय विद्यार्थ्यांना ही भरपाई मिळाली. ५ सप्टेंबर २०२३ रोजी ही घटना घडली. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील एंथ्रोपोलॉजी विभागातील पीएचडीचा विद्यार्थी आदित्य प्रकाश जेवणासाठी आणलेलं पालक पनीर मायक्रोवेव्हमध्ये गरम करत होता. एका कर्मचाऱ्यांनी तिथे येऊन अन्नाच्या "तीव्र वासाबद्दल" तक्रार केली आणि मायक्रोवेव्ह वापरू नका असं सांगितलं.
प्रकाशने यावर त्या कर्मचाऱ्याला ओरडू नका असं सांगितलं आणि "हे फक्त जेवण आहे, मी ते गरम करून लगेच निघून जाईन" असं स्पष्ट केलं. मात्र, हा वाद तिथेच थांबला नाही. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आणि सिव्हिल राइट्स खटल्यानंतर विद्यापीठाला आदित्य प्रकाश आणि त्याची पार्टनर उर्मी भट्टाचार्य (जी स्वतः देखील पीएचडी विद्यार्थिनी होती) यांच्याशी तडजोड करावी लागली.
विद्यापीठाने केवळ या दोघांना २ लाख डॉलर (जवळपास १.८ कोटी रुपये) भरपाईच दिली नाही, तर त्यांना 'मास्टर्स डिग्री' देखील बहाल केली. मात्र, भविष्यात त्यांना या विद्यापीठात शिक्षण घेण्यास किंवा नोकरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आता हे दोघेही कायमचे भारतात परतले आहेत.
'इंडियन एक्सप्रेस' च्या रिपोर्टनुसार, प्रकाश या घटनेला "सिस्टमिक रेसिझम" म्हणतो. त्याच्या मते, विभागाने त्यांना ती मास्टर्स पदवी देण्यासही नकार दिला होता, जी सामान्यतः पीएचडी दरम्यान विद्यार्थ्यांना सहज मिळते. याच कारणामुळे त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कोलोराडो जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात, दोघांनी आरोप केला की जेव्हा प्रकाशने भेदभावाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा विद्यापीठाने त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करण्यास सुरुवात केली.
खटल्यात असं म्हटलं आहे की, विभागाच्या किचन पॉलिसीचा परिणाम विशेषतः दक्षिण आशियाई समुदायावर होतो. यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी सार्वजनिक ठिकाणी आपला डबा उघडण्यासही घाबरू लागले होते. या वागणुकीमुळे त्यांना मानसिक ताण, भावनिक त्रास आणि मोठं नुकसान सहन करावं लागलं.
उर्मी भट्टाचार्यने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 'टीचिंग असिस्टंट'ची नोकरी कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आली. दोन दिवसांनंतर जेव्हा त्यांनी इतर तीन विद्यार्थ्यांसोबत भारतीय जेवण आणलं, तेव्हा त्यांच्यावर 'कॅम्पसमध्ये दंगल भडकवल्याचा' आरोप लावण्यात आला. मात्र, नंतर हे सर्व आरोप फेटाळले गेले.
